गडचिरोली,
ABVP Vidarbha अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विदर्भ प्रांताचे 54 वे प्रांत अधिवेशन 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली येथील आरमोरी रोडवरील ‘सुमानंद’ सभागृह येथे संपन्न होणार आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली विभाग कार्यालयात ‘इन्फ्लुएन्सर मीट’चे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, अभाविपचे पूर्व कार्यकर्ते सौरभ कावळे, प्रांत सोशल मीडिया संयोजक जयेश ठाकरे, गडचिरोली नगरमंत्री संकेत म्हस्के, गडचिरोली नगर विस्तारक सुमित बरांडे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक व डिजीटल माध्यमांशी जोडलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ‘इन्फ्लुएन्सर मीट’मध्ये आगामी प्रांत अधिवेशनाची उद्दिष्टे, स्वरूप व महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थी, युवक व समाजहिताशी संबंधित विविध विषयांवर अधिवेशनात होणार्या चर्चा, ठराव आणि उपक्रम यांचा आढावा उपस्थितांना करून देण्यात आला. तसेच डिजीटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून अधिवेशनाची माहिती समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, अभाविपचे प्रांत अधिवेशन हे केवळ संघटनात्मक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा देणारे व्यासपीठ आहे. समाजमाध्यमे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले अनुभव मांडत अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीचा शेवट संवादात्मक चर्चा व समन्वयाच्या संकल्पाने झाला. आगामी 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशन गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.