अचलपूर,
achalpur-accident-farmer शेतीत दिवसभर कष्ट करून घरी परतणार्या एका शेतकर्यावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना अचलपूर तालुक्यातील कारणबाग शेत शिवारात घडली. प्रमोद शिवहरी मेहरे उर्फ बाबू (वय ४० वर्षे, रा. नौबागपुरा, अचलपूर) यांचा ट्रॅक्टर अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर बसलेला गुलाब नामक मजूर गंभीर जखमी झाला आहे. प्रमोद मेहरे यांनी गिरीश खंडेलवाल (रा. च्यावलमंडी) यांच्या कारणबाग शेत शिवारातील शेती लागवडीचे काम घेतले होते.
achalpur-accident-farmer सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतातील कापूस वेचून कापसाचे गाठोडे ट्रॅक्टरवर घेऊन ते घरी परतत होते. मात्र, सापण नदी पात्राजवळून जात असताना नदीकाठचा कठडा अचानक खचला आणि ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने प्रमोद मेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर बसलेला गुलाब हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रमोद मेहरे हे कष्टकरी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. achalpur-accident-farmer त्यांच्या अकाली मृत्यूने नौबागपुरा परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतीकामासाठी रोज जीव धोक्यात घालून काम करणार्या शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पुढील तपास परतवाडा पोलिस करत आहे .