अजित पवारांचा पहिला डाव; 37 उमेदवारांची यादी जाहीर

29 Dec 2025 12:48:57
मुंबई,
Ajit Pawar's list of 37 candidates मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही यादी अधिक चर्चेत आली आहे.
 

Ajit Pawar 
 
आमदार सना मलिक यांनी याआधी मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून सुमारे 100 उमेदवार उभे केले जातील, असे संकेत दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 37 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी नवाब मलिक आणि सना मलिक यांच्याकडे सोपवण्यात आली असून, महायुतीपासून वेगळी वाट धरत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे रणनिती आखल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
 
या निवडणुकीत मलिक कुटुंबाची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान आणि सुन बुशरा नदीम मलिक हे तिघेही निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग आरक्षणात बदल झाल्याने कप्तान मलिक यांनी स्वतःसाठी नवीन प्रभाग निवडला असून, महिलांसाठी राखीव झालेल्या प्रभागातून सुनेला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या यादीत कौटुंबिक प्रतिनिधित्वावरूनही चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. अखेर आज निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत ही पहिली यादी जाहीर करण्यात आली. या घोषणेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होत चालली आहेत.
 
दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधूंंसोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने तुतारी चिन्हावरील अनेक इच्छुक नाराज झाल्याचं चित्र आहे. तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचं लक्षात येताच काही इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधूंच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यांचीही पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंच्या आघाडीत 10 ते 12 जागा मिळण्याची चर्चा आहे. त्याचवेळी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील जागावाटपाचं गणितही जवळपास ठरले असून बहुतेक जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित काही जागांवर चर्चा सुरू असून राष्ट्रीय पातळीवर समन्वय साधून तोडगा काढला जाईल, अशी माहिती आहे. भाजपकडून काही प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल होणार असून आणखी नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही तासांत आणि दिवसांत मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून, उमेदवारांच्या याद्यांमुळे वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0