वृंदावन,
Avoid coming to Banke Bihari temple नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वृंदावनातील श्री बांके बिहारी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असून मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी भाविकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. २९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत मंदिर परिसरात अभूतपूर्व गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, अत्यावश्यक कारण नसल्यास या दिवसांत मंदिर दर्शनासाठी येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, दरवर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक वृंदावनात दाखल होतात. त्यामुळे दर्शन व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेवर मोठा ताण येतो. ही परिस्थिती लक्षात घेता, भाविकांनी वृंदावनला येण्यापूर्वी गर्दीची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे.
मथुरा पोलिसांनीही भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या कालावधीत दररोज सुमारे चार ते पाच लाख भाविक वृंदावनात दाखल होत आहेत, तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी या गर्दीच्या दिवसांत मंदिर दर्शन टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
भाविकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. शांत आणि सुरक्षित दर्शनाची व्यवस्था राखण्यासाठी भाविकांनी गर्दीत संयम ठेवावा आणि घोषणांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वृंदावनला येताना अनावश्यक प्रवास टाळावा, मोठ्या पिशव्या किंवा मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मंदिर परिसरात खिसे चोरांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला असून, बूट घालून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असल्याची आठवण करून देण्यात आली आहे. प्रशासनाने भाविकांनी सहकार्य केल्यासच सर्वांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट केले आहे.