फ्रान्स,
Brigitte Bardot death फ्रान्सच्या दिग्गज अभिनेत्री ब्रिजिट बार्डोट यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दक्षिण फ्रान्समधील त्यांच्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यांच्या निधनामुळे फ्रेंच चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
ब्रिजिट बार्डोट यांनी 1950 च्या दशकात फ्रेंच चित्रपटसृष्टीत एक नवं पर्व सुरू केलं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1956 मध्ये प्रदर्शित झालेला ‘एंड गॉड क्रिएटेड वुमन’ हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच 1973 मध्ये त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला आणि सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी वाहून दिलं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करत त्यांना "या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्व" म्हटले आहे.
ब्रिजिट बार्डोट Brigitte Bardot death यांचा जन्म 1934 साली पॅरिसमध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. सुरुवातीला त्यांचा मार्ग बॅले डान्सकडे जाण्याचा होता, मात्र नशिबाने त्यांना अभिनयाच्या जगात आणलं. किशोरवयातच त्यांनी ‘एली’ मॅगझिनच्या कव्हरवर झळकून देशभरात नाव कमावलं. ‘एंड गॉड क्रिएटेड वुमन’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीची भूमिका त्या काळात प्रचंड वादग्रस्त ठरली आणि काही अमेरिकन राज्यांमध्ये चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती.ब्रिजिट बार्डोट फक्त अभिनयामुळेच नव्हे, तर त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही सतत चर्चेत राहिल्या. समलैंगिकांविरोधातील आणि स्थलांतरितांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा टीका झेलावी लागली. वांशिक द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली त्यांना अनेकदा दंडही ठोठावण्यात आला होता. 2008 मध्ये एका वक्तव्यानंतर त्यांच्यावर १५,००० युरोचा दंडही लावण्यात आला होता.
ब्रिजिट बार्डोट यांचं खाजगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. त्यांनी चार विवाह केले आणि त्यांचे १७ प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः कबूल केले होते की, “नात्यातील आकर्षण कमी झालं की मी पुढे निघून जायचे. मी नेहमीच एक्स्ट्रीम भावनांच्या शोधात होते.”फ्रेंच सिनेमाची आयकॉन, वादग्रस्त वक्तव्यांची मालकीण आणि प्राणीप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिजिट बार्डोट यांचं जाणं हे एका युगाच्या अंतासारखं मानलं जात आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी हा एक अविस्मरणीय शोककाळ आहे.