नवी दिल्ली,
change in Indian cricket नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. टीम इंडिया 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असली, तरी त्याआधीच बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत आलेल्या एका रिपोर्टमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. 2025-26 या हंगामासाठी जाहीर होणाऱ्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत यंदा लक्षणीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सामान्यतः बीसीसीआय फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करत असते, मात्र यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय जाहीर होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यावेळी मोठा धक्का बसू शकतो. सध्या ए+ ग्रेडमध्ये असलेल्या या दोन्ही दिग्गजांना पुढील यादीत खालच्या ग्रेडमध्ये स्थान दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या ग्रेडमध्येही बदल होण्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर शुभमन गिलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळणारा गिल सध्या ग्रेड ए मध्ये आहे. मात्र टेस्ट आणि वनडे संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आल्याने त्याला थेट टॉप ग्रेडमध्ये बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या टॉप ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असून या ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपयांचा करार मिळतो. दरम्यान, काही खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दीर्घकाळ संघाबाहेर असल्याने, तर मुकेश कुमार सातत्याने निवडीत स्थान न मिळाल्याने त्यांच्या नावावर गंडांतर येऊ शकते.
याउलट, काही तरुण खेळाडूंना प्रमोशन मिळण्याची चिन्हे आहेत. तिलक वर्मा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा यांची कामगिरी लक्षात घेता त्यांना वरच्या ग्रेडमध्ये स्थान दिले जाऊ शकते. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार प्रदर्शन आणि आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने इशान किशनचे नाव सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत कायम राहण्याची शक्यता आहे. एकूणच, 2025-26 साठीची बीसीसीआयची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी भारतीय क्रिकेटसाठी मोठ्या बदलांची नांदी ठरू शकते आणि या निर्णयांचा परिणाम आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांवरही दिसून येण्याची शक्यता आहे.