पुणे,
Corruption in the Aai Ekvira Devi Trust लोणावळ्यातील कार्ला गडावरील प्रसिद्ध आई एकवीरा देवी देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. देवीचे पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि देवस्थानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशमुख यांच्या दाव्यानुसार, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडून लंपास करण्यात आली असून, देवस्थानाची मालमत्ता वैयक्तिक कामासाठी वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुजारी देशमुख यांनी सांगितले की, देवस्थानात पारदर्शकतेचा अभाव आहे आणि अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. विशेषतः 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून जमा होणारा पैसा ट्रस्टच्या अधिकृत बँक खात्यात न जमा करता हडपला गेला. तसेच, देवस्थानाच्या मालकीच्या 'इनोव्हा' आणि 'फॉर्च्युनर' सारख्या महागड्या गाड्यांचा वापर वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांनंतर पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. त्यांनी उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणामुळे आई एकवीरा देवीच्या लाखो भाविकांमध्ये सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.