विशाखापट्टणमजवळ टाटानगर–एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग

29 Dec 2025 09:14:10
विशाखापट्टणम,
Fire on Tatanagar-Ernakulam Express विशाखापट्टणमजवळ आंध्र प्रदेशात टाटानगर–एर्नाकुलम एक्सप्रेसला लागलेल्या आगीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाखापट्टणमपासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर असलेल्या यलमंचिली स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. काल रात्री उशिरा सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास ट्रेनच्या दोन डब्यांना अचानक आग लागल्याची सूचना पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पेंट्री कारजवळ असलेल्या बी-१ एसी कोचमध्ये प्रथम आग लागली आणि काही वेळातच ती एम-२ कोचपर्यंत पसरली. बी-१ कोचमध्ये ८२ प्रवासी तर एम-२ कोचमध्ये ७६ प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

tatanagar ernakulam express fire 
बी-१ कोचमधून धूर निघताना एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ चेन ओढून ट्रेन थांबवली. त्यामुळे प्रवाशांना वेळेत खाली उतरता आले आणि मोठी दुर्घटना टळली. काही क्षणांतच संपूर्ण डबा आगीने वेढला गेला होता. आग आटोक्यात आणल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जळालेले दोन्ही डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्धा तास उशिराने ट्रेन पुन्हा आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाली. आग विझवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बी-१ कोचमधून एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर (वय ७५) अशी झाली आहे. अपघाताच्या वेळी ते बी-१ कोचमध्ये प्रवास करत होते आणि आगीत गंभीररीत्या भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0