कानात गाणे अन् रस्त्यावर मरणे!

29 Dec 2025 05:30:00
वेध....
listening to music driving संगीत हे औषध आहे. जे संबंधित व्यक्तीच्या मनातील जखमा भरून काढते. पण हे औषध केव्हा उपयोगी पडते त्याचे ठोकताळे ठरलेले आहेत. तुम्ही एकांतात बसून कानात हेडफोन लावून गाणे ऐकले तरच ते लाभदायक ठरते. रस्त्यावर वाहन चालवीत असताना तुम्ही हेडफोनद्वारे कानात गाणे ऐकत असाल तर ते यमाकडे जाण्याचे आमंत्रण ठरते. म्हणूनच कानात गाणे असले तर रस्त्यावर मरणे हमखास पक्के असते. मग अशावेळी ते संगीत औषधाचे नव्हे तर यमाला खुश करणारे ठरते. हा भयावह प्रकार आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शंभरपैकी 80 वाहनचालक ब्ल्यूट्यूथ हेडफोनचा वापर करून गाणे ऐकत असतात. परिणामी त्यांचे रस्त्यावरील वाहनांकडे लक्ष नसते. ते आपल्याच धुंदीत जातात आणि समोरच्याला धडक मारतात. अनेकदा त्यांच्यावर वाईट प्रसंग ओढवतो अन् मागून एखादे मोठे वाहन येऊन त्यांना चिरडून जाते. यावर लोक संताप व्यक्त करतात. मात्र मूळ समस्या काय यावर कुणाचेही लक्ष नसते. या जीवघेण्या प्रकारावर आजच नियंत्रण न आणल्यास उद्या लोक रस्त्यावर मरतील. ते मरणे आपल्या देशाला परवडणारे नाही. आपला देश युवकांचा असल्याचा आपण अभिमान बाळगतो. पण आपले युवक तर हेडफोन लावत गाणे ऐकण्यातच मशगूल झाले आहेत.
 
 
 
lisning music
 
 
त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टींची अपेक्षा नेमकी करणार कशी? कारण त्यांना गाणे ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. ते मोबाईलच्या चक्रव्यूहात पूर्णत: अडकले आहेत. नव्हे भविष्यात याच कारणाने त्यांचा ‘अभिमन्यू’ होणार हे निश्चित आहे. मोबाईलचे व्यसन चरस, गांजा, ब्राऊनशुगर, एमडी पावडर आणि मद्यापेक्षाही भयानक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने वाहन चालवीत असताना मोबाईल पाहिला तर बातमी बनते. मग जे हजारो दुचाकीचालक, कारचालक, ऑटोचालक, ई-रिक्षाचालक कानात गाणे ऐकतच वेगाने जातात, त्यांचे काय? त्यांना पुरस्कार द्यायचा की कठोर शासन करून वठणीवर आणायचे यावर कृती करावीच लागेल. त्यांनी खुशाल गाणे ऐकावे, पण ते घरी बसूनच. रस्त्यावर जेव्हा ते वाहन चालवितात तेव्हा त्यांनी वाहतूक नियम पाळायलाच हवे. कारण त्यांच्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला भोगावी लागते. त्यांची तर मजा होते पण ती समोरची व्यक्ती चूक नसतानाही यमाघरी जाते किंवा जायबंदी होत दवाखान्याचे बिल भरत भसते. परिणामी त्याचे कुटुंबीय देशोधडीला लागते. त्याला अपघातानंतर लाखो रुपये स्वत:च्या उपचारांवर खर्च करावे लागतात. पोलिस यंत्रणा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून काही वेळाने त्याला सूचनापत्र देऊन सोडून देते. पोलिसांना वाटते आम्ही कारवाई केली, पण जो रुग्णालयात उपचार घेत असतो, त्याचे काय? त्याचा विचारच करायला कुणालाही वेळ नाही. जायबंदी झालेला मीच पापी असे समजून स्वत:लाच कोसत बसतो.listening to music driving या सर्व समस्यांतून अनेक जण गेले आणि जात आहेत. यावर आता उपाय करायचा झाल्यास ज्याच्या हातून अपघात झाला त्याच्याकडूनच जखमींचा संपूर्ण खर्च कठोरतेने वसूल करावा. नव्हे तशाच नियमांची तरतूद कायद्यात करायला हवी. जोपर्यंत जायबंदी झालेली व्यक्ती पूर्णपणे बरी होत नाही तोवर आरोपीकडून खर्च घ्यावा. तो देत नसल्यास त्याची संपत्ती विकावी. चूक झाल्यावर सॉरी म्हणायचे आणि जखमींना रस्त्यावर तडफडत सोडून द्यायचे हा प्रकार त्वरित संपुष्टात यावा. जेव्हा चूक केल्यावर उपचारांचा खर्च करण्याची शिक्षा होईल, त्यानंतर कुठलाही चालक कानात गाणे वाजवीत वाहन चालविण्याचे धाडस करणार नाही. पण अशी व्यवस्था खरोखरच भारतात अंमलात येऊ शकते का, तर याचे उत्तर होय असेच द्यावे लागेल. याअनुषंगाने सरकारने कायदे तयार करावेत किंवा सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश द्यावेत. वस्तुत: रस्त्यावर हेडफोनचा वापर टाळा, जीवघेणा अपघात टाळा हा मंत्र प्रत्येकाने कृतीत आणावा. शेवटी, सुरक्षित राहायचे झाल्यास कानात हेडफोन, डोक्यात मज्जा । अपघाताची मिळेल मोठी सजा ! ही वास्तविकता समजूनच वाहन चालवावे.
अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859
Powered By Sangraha 9.0