नवी दिल्ली ,
new year is forbidden in Islam नवीन वर्षाच्या स्वागतावर आक्षेप घेत अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी फतवा जारी केला असून, मुस्लिम समाजाने अशा उत्सवांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या मते, ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पार्ट्या, नाच-गाणे, दिखावा, उधळपट्टी आणि कथित अश्लील वर्तन हे इस्लामिक शिकवणींना विरोधी आहेत. बरेली येथे बोलताना मौलाना रझवी यांनी स्पष्ट केले की इस्लाममध्ये नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होत नाही, तर मोहरम महिन्यापासून होते. त्यामुळे पाश्चात्य पद्धतीनुसार नवीन वर्ष साजरे करणे शरियतच्या नियमांनुसार योग्य नाही. त्यांनी असेही सांगितले की नवीन वर्ष साजरे करणे ही ख्रिश्चन परंपरा असून मुस्लिम समाजाशी त्याचा कोणताही धार्मिक संबंध नाही.
मौलाना रझवी यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पार्ट्या, नृत्य, संगीत आणि अनावश्यक खर्चावर टीका केली. अशा कार्यक्रमांमध्ये अनेकदा इस्लाममध्ये निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टी घडतात, त्यामुळे मुस्लिमांनी त्यापासून स्पष्ट अंतर ठेवावे, असे त्यांनी सांगितले. इस्लाममध्ये संयम, साधेपणा आणि शिस्त यांना महत्त्व असून गोंगाट आणि दिखावा धर्माच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. आपले मत मांडताना त्यांनी उदाहरण दिले की केवळ इस्लाममध्येच नव्हे तर हिंदू धर्मातही नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीत होत नाही, तर चैत्र महिन्यापासून होते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण कोणत्याही धर्माच्या मूलभूत परंपरांशी सुसंगत नाही, असे ते म्हणाले.
मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की मुस्लिम तरुण-तरुणींनी कोणत्याही परिस्थितीत अशा पार्ट्या आयोजित करू नयेत. जर अशा कार्यक्रमांमध्ये नृत्य, संगीत किंवा दिखाव्याचा अतिरेक होत असेल, तर इस्लामिक विद्वान त्याला विरोध करतील. त्यांनी समाजाला आवाहन केले की नवीन वर्षाच्या नावाखाली होणाऱ्या चुकीच्या गोष्टींपेक्षा लोकांनी धार्मिक आचरण, इबादत आणि समाजोपयोगी कार्यांकडे लक्ष द्यावे.