हवेत वीजेसारखी झेप! ताशी २९० किमी वेगाचा ‘पेरेग्रीन फाल्कन’ नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दाखल

29 Dec 2025 16:56:59
नाशिक,
nandur madhmeshwar sanctuary पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पेरेग्रीन फाल्कन’ अर्थात बहिरी ससाण्याचे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आगमन झाले असून, यामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य सध्या ३५ ते ४० हजार देशी-विदेशी पक्ष्यांनी बहरले असून, थंडीचा पारा घसरताच गोदावरी नदीवरील नांदूरमध्यमेश्वर बंधारा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे.
 

ससाणा  
 
 
अलास्कामधून सोनचिखल्या, सैबेरियामधून क्रौंच करकोचा, उत्तर कोरियामधून थापट्या, पूर्व सैबेरियातून तरंग व युरेशियन विजन, उत्तर युरोप आणि पूर्व सैबेरियातून चक्रांग बदक व तलवार बदक, हिमालयातून नकटा, लडाखमधून चक्रवाक, कझाकिस्तान व तिबेटमधून पट्ट कादंब, तसेच उत्तर युरोपमधून लालसरी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून या अभयारण्यात दाखल झाले आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांमुळे परिसरातील जैवविविधता अधिकच समृद्ध झाली आहे.
याच कालावधीत पेरेग्रीन फाल्कन अर्थात बहिरी ससाण्याचे दर्शन नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटक व पक्षीमित्र डॉ. श्रीराम उपाध्ये यांना झाले. त्यांनी या दुर्मिळ आणि वेगवान पक्ष्याची अत्यंत सुंदर व मनमोहक छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सांगितले की, बहिरी ससाणा सहसा दिसून येत नाही आणि नांदूरमध्यमेश्वर परिसरात त्याचे आगमन क्वचितच होते. हा पक्षी प्रामुख्याने युरोप व अमेरिका खंडात आढळतो आणि मोठा प्रवास करून तो भारतात येतो, असे त्यांनी नमूद केले.बहिरी ससाणा हा निसर्गातील एक अद्भुत शिकारी पक्षी असून, त्याच्या विलक्षण चपळतेसाठी आणि प्रचंड वेगासाठी ओळखला जातो. भारतीय उपखंडात त्याला ‘शाही ससाणा’ असेही संबोधले जाते.nandur madhmeshwar sanctuary हा पक्षी लहान पक्षी तसेच काही सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो. अतिशय वेगाने हवेत झेप घेत भक्ष्यावर आघात करून तो चोचीने भक्ष्याच्या पाठीचा कणा तोडतो, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
गडद हिरवट रंगाचे पंख, चपळ शरीरयष्टी आणि डोळ्यांच्या बाजूला असलेल्या काळ्या पट्ट्यांमुळे हा पक्षी सहज ओळखता येतो. पेरेग्रीन फाल्कन हा कदाचित पृथ्वीवरील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो. तो ताशी १८० मैलांहून अधिक, म्हणजेच सुमारे २९० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकतो. शिकारीकडे झेपावताना त्याचा वेग याहूनही अधिक वाढतो, असे अभ्यासकांचे मत आहे.नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी हा एक दुर्मिळ व आनंददायी अनुभव ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0