मशिदीत स्फोटानंतर सीरियामध्ये सांप्रदायिक दंगली

29 Dec 2025 10:09:30
होम्स,
Sectarian riots in Syria सीरियामधील होम्स शहरात मशिदीत झालेल्या स्फोटानंतर देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणखी चिघळली असून रविवारी सांप्रदायिक हिंसाचाराचे भीषण चित्र पाहायला मिळाले. अलावाइट धार्मिक अल्पसंख्याक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून साठहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हिंसाचाराची मालिका होम्समधील अलावाइट मशिदीत नमाज सुरू असताना झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उफाळून आली. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू तर १८ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी रविवारी होम्ससह लाझिका, टार्टस आणि इतर भागांत हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि निदर्शने सुरू झाली. काही ठिकाणी ही निदर्शने हिंसक वळणावर गेली.
 

Sectarian riots in Syria 
 
सरकारी दूरदर्शननुसार, टार्टस परिसरातील एका पोलिस ठाण्यावर ग्रेनेड फेकण्यात आला, ज्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. लाझिका येथे संतप्त जमावाने सुरक्षा दलांच्या वाहनांना आग लावली. नंतर राज्य वृत्तसंस्था सानाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी ठार झाला. स्थानिक आरोग्य यंत्रणांनी या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू आणि सुमारे ६० जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात होम्समधील मशिदीत स्फोट घडवून आणण्यासाठी आधीच स्फोटके पेरण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अद्याप हल्लेखोरांची अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, शनिवारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सराया अन्सार अल-सुन्ना’ नावाच्या एका अल्पज्ञात कट्टरपंथी संघटनेने टेलिग्रामवरील निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अलावाइट पंथाच्या सदस्यांनाच लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
 
रविवारी झालेल्या निदर्शनांचे आवाहन परदेशात राहणारे अलावाइट धर्मगुरू शेख गझल गझल यांनी केले होते. ते सुप्रीम अलावाइट इस्लामिक कौन्सिलचे प्रमुख आहेत. लाझिकिया येथे सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार दगडफेक झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी दोन्ही गटांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या चकमकीत अनेक निदर्शक जखमी झाले असून नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एकूणच, मशिदीतल्या स्फोटानंतर सीरियातील सांप्रदायिक तणाव उफाळून आला असून विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून देशभरात तणावाचे वातावरण कायम आहे.
Powered By Sangraha 9.0