सांगा साहेब, पिकाला युरिया द्यायचा की नाही?

29 Dec 2025 19:59:45
सेलू, 
 
wardha-farmers-urea सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना सध्या गहू पिकाला युरिया हे रासायनिक खत देण्याची वेळ आहे. मात्र, खतापेक्षा लिंकिंग महाग असल्याने शेतकर्‍यांना पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रकार सुरू आहे. असे असताना कृषी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे सांगा साहेब, पिकाला युरिया द्यायचा की नाही, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
 
 

wardha-farmers-urea 
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
wardha-farmers-urea जिल्ह्यात यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे कपाशी व सोयाबीन पिकाने आधीच शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. शासन निर्णय घेतात पण ते अंमलात येत नसल्याचे दिसून येत आहे. आता रबी हंगाम सुरू आहे. नापिकीने हतबल झाला असतानाच शेतकरी गव्हाचे पीक घेण्यासाठी सरसावला खरा पण ऐन गहू पिकाला युरिया देण्याची वेळ असल्याने शेतकरी कृषी केंद्रात जाताच ‘मसाल्या पेक्षा भाजी महाग’ असल्याचे दिसून येत आहे. युरियाची एक बॅग २६६ रुपये असली तरी या बरोबर ३०० रुपये किमतीचे लिंकिंग गरज नसताना शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे.
 
 
 
wardha-farmers-urea मग, सांगा ना साहेब, जी वस्तू घ्यायची नाही ती माथी का मारली जात आहे. यामुळे गहू पिकाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. आर्थिक विवंचनेत जीवन जगत असलेल्या शेतकर्‍यांपुढे पुन्हा आर्थिक तंगी निर्माण केली जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. युरिया घेतेवेळी जर त्यासोबत त्यांना दुसरे महागडे खत देत असेल तर यावर कृषी विभागाने अंकुश लावावा, अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0