थेट पोलिस स्टेशन समोरील कृषी केंद्र फोडले

03 Dec 2025 20:00:00
वर्धा, 
agricultural-center-demolished : मंगळवारी दिवसभर शहरातील विविध मतदान केंद्रांवरून वर्धा नगरपालिकेसाठी शांततेत मतदान व्हावे यासाठी पोलिस यंत्रणा राबली. मात्र, रात्री पोलिसांना आव्हान देणारी घटना शहर पोलिस स्टेशन समोर घडली. चोरट्यांनी थेट पोलिस स्टेशन समोरील कृषी केंद्राचे शटर तोडून दुकानातील ७५ हजारांची रोख पळविल्याचे बुधवार ३ रोजी सकाळी उघडकीस आली.
 

agri 
 
काही दिवसांपासून शहर आणि आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी चक पोलिस स्टेशन समोर असलेल्या कृषी केंद्रालाच लक्ष्य केले. महादेवपुरा भागातील दत्त मंदिर परिसरातील दिलीप जाजोदिया यांचे शहर पोलिस स्टेशनसमोर कृषी केंद्र आहे. आज बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव कृषी केंद्र उघडण्यासाठी गेला असता त्याला दुकानाचे शटर वाकून व कुलूप तुटलेले दिसले. आत प्रवेश करून पाहिल्यावर दुकानातील साहित्य अस्तव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. दुकानातील ७५ हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळताच व्यापार्‍यांनी घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
चोरटे सीसीटीव्हीत कैद
 
 
चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी चोरी झालेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची बारकाईने पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासले. याच भागातील एका सीसीटीव्हीत दोन चोरटे चोरी करीत असल्याची घटना कैद झाली आहे. ते सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0