सहा वर्षांच्या चिमुलीकवर अत्याचार

03 Dec 2025 21:15:44
चांदूरबाजार,
atrocities-shirajgaon-band : तालुक्यातील शिरजगाव बंड येथील सहा वर्षांच्या चिमुरडीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना २ डिसेंबर रोजी घडली. ही धक्कादायक घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहेत.
 

amt 
 
संग्रहित फोटो 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला (५६, रा. शिरजगाव बंड ) याने आपल्या घराशेजारी राहणार्‍या चिमुरडीला बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वीस रुपये देऊन तिला विश्वासात घेतले आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नेऊन तिच्यावर लौगिक अत्याचार केला. शाळा परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत हा घृणास्पद प्रकार घडवून आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. घटना समोर आल्यानंतर मुलीच्या आईने ३ डिसेंबर रोजी चांदूरबाजार पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत बीएनएस कलम ६४ (१), ६५ (२) सह पोस्को कलम ४, ६, १२ कायद्यान्वये आरोपीला अटक केली. ठाणेदार अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक विनोद इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
 
 
आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पीडित मुलीचे नातेवाईकांसह शहरातील नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून मागणी केली होती. त्यामुळे पोलिस स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मालेगावसारख्या प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील घटना समाजमनाला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी आहे. अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कठोरात कठोर कायदा बनवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.
Powered By Sangraha 9.0