चैत्यभूमीकडे येणार्‍या वाहनांना टोलमाफी द्या

03 Dec 2025 21:14:01
अमरावती, 
nitin-gadkari : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे दाखल होणार्‍या लाखो अनुयायांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी ६ डिसेंबर रोजी मुंबईत येणार्‍या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे काँग्रेस खासदारांनी बुधवारी दिल्लीत भेट घेऊन केली.
 
 
gadkari
 
 
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपर्‍यातून अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होतात. त्यापैकी मोठा हिस्सा हा खाजगी वाहनाने किंवा प्रवासी वाहनाने लांबवरून मुंबईत येणार्‍यांचा असतो. मुंबईकडे येताना विविध ठिकाणी लागणार्‍या महामार्ग टोलमुळे अनुयायांवर आर्थिक भार पडतो. याच पृष्ठभूमीवर ६ डिसेंबरसाठी एकदिवसीय टोलमाफी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन देताना अमरावतीचे खा. बळवंत वानखडे, मुंबईच्या खा. वर्षा गायकवाड, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे आणि खा. रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनांचा व अस्मितेचा मान राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0