भराडी देवीचा कौल...आंगणेवाडी जत्रा 9 फेब्रुवारीला!

03 Dec 2025 12:23:32
आंगणेवाडी,
Bharadi Devi's Kaul दक्षिण कोकणातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची प्रतिक्षित जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. बुधवारी सकाळी देवीचा कौल घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा लाखांहून अधिक भाविक जत्रेसाठी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंगणेवाडीची जत्रा ही विशेष परंपरा जपणारी. या यात्रेला कोणत्याही पंचांगातील तिथीची बंधनं नसतात; देवीचा कौल हाच यात्रेचा दिवस ठरवतो. दूरदूरहून येणारे भाविक वस्त्रालंकारांनी सजलेल्या देवीचे दर्शन घेऊन तृप्त होत, आपले नवस पूर्ण झाल्याचा अनुभव घेतात.
 
 

bharadi devi 
भाविकांच्या सोयीसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आंगणेवाडीचे प्रमुख तसेच आंगणे कुटुंबीय सक्रिय आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली. जत्रेमुळे परिसरातील अनेक व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबईतील चाकरमानी जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तारीख जाहीर होताच रेल्वे तिकीट आणि खाजगी वाहन बुकिंगसाठी नेहमीप्रमाणे स्पर्धा सुरू होणार आहे. राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे नेते जत्रेत हजेरी लावतात, त्यामुळे ग्रामस्थांसह स्थानिक प्रशासनासही नियोजनाची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. दरम्यान, जत्रेचा कौल झाल्यानंतर 3 ते 5 डिसेंबर 2025 या तीन दिवसांदरम्यान श्री देवी भराडी मंदिर धार्मिक विधीसाठी बंद राहणार असून, मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0