भाजपा जिल्हा उपाध्यक्षाच्या घरावर मध्यरात्री भ्याड हल्ला

03 Dec 2025 19:12:27
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
cowardly-attack : नगर परिषद पांढरकवड्याचे मतदान पार पडल्यानंतर मध्यरात्री भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेल्केवार यांच्या आखाडा वॉर्डमधील घरावर दगडफेक करून तीन गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले. यावेळी श्रीराम मेल्केवार बाहेरगावी होते. तर घरात त्यांच्या पत्नी, मुलगी आणि सून या तिन्ही महिलाच घरी होत्या. या दगडफेकीत मेल्केवार यांच्या 2 मालवाहू गाड्यांच्या सर्व काचा, एका चारचाकी वाहनाची मागील काच फोडण्यात आली. तर घराचेही थोडे नुकसान झाले आहे.
 
 

y3Dec-Shreeram 
 
 
 
या प्रकरणी बुधवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी श्रीराम मेल्केवार यांच्या पत्नी ज्योती मेल्केवार यांनी या प्रकरणी अमर चौटपेल्लीवार यांच्यासह 10 ते 15 व्यक्ती आपल्या घरावर चालून येऊन दगडफेक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहे. तर अमर चौटपल्लीवार यांच्या पत्नी आणि माजी नगरसेवक समीक्षा चौटपल्लीवार यांच्या तक्रारीवरून श्रीराम मेल्केवार यांच्या विरोधात अर्वाच्य शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.
 
 
यावेळी मेल्केवार यांच्या सोबत आमदार राजू तोडसाम, भाजपाचे अनेक पदाधिकारी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. तर अमर आणि समीक्षा चौटपल्लीवार यांच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी व खेतानी फाऊंडेशनचे सलीम खेतानी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
भाजपा आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमा झाल्याने काही वेळ गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल व ठाणेदार दिनेश झांबरे यांनी तगडा बंदोबस्त ठेवत वातावरण शांत करण्यासाठी परिश्रम घेतले.
शिवसेनेच्या गुंडांचे असे भ्याड हल्ले खपवून घेणार नाही: भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान
 
 
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या नपा निवडणुकीमध्ये भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड जन समर्थन लाभले. या गोष्टीने चिडून जाऊन पांढरकवडा येथील जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेल्केवार यांच्या घरावर अमर चोटपल्लीवार व त्याच्या साथीदारांनी भ्याड हल्ला केला. यावेळी घरामध्ये महिला होत्या. त्यांना शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांनी शिवसेनेचे गुंड अमर चोटपल्लीवार व इतर यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. परंतु शिवसेनेचे असे गुंड भाजपा मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0