मुंबई,
Fadnavis-Sanjay Raut meeting राज्याच्या राजकारणात महत्वाची घटना घडली आहे. मुंबईत झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आघाडीचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीचा कालावधी जवळपास १५ मिनिटांचा होता आणि या दरम्यान दोघांमध्ये हसतखेळत, हलक्या-फुलक्या वातावरणात चर्चा झाली. या भेटीमुळे राजकारणात नवीन चर्चासत्राला सुरुवात झाली आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते.
संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते, ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्या काळात त्यांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. मात्र प्रकृती सुधारल्यामुळे त्यांनी आता काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विवाहसमारंभात त्यांची तब्येत विचारली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
याआधी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील राऊत यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला होता. तब्येत सुधारल्यावर राऊत पुन्हा राजकीय घडामोडींवर सोशल मीडियाद्वारे भाष्य करत राहिले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या विवाहसमारंभाच्या फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. या भेटीमुळे फडणवीस आणि राऊत यांच्या नात्याविषयी राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात या कार्यक्रमात थेट भेट झाली की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.