गुरुग्राम
Air hostess's suspicious death हरियाणातील गुरुग्राममध्ये नववर्षाच्या पार्टीनंतर एका तरुण एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डीएलएफ फेज-१ परिसरात घडलेल्या या घटनेत २५ वर्षीय तरुणीचा काही तासांतच मृत्यू झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मृत तरुणीचे नाव सिमरन डडवाल असून ती मूळची पंजाबमधील मोहाली येथील रहिवासी होती. सिमरन एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रविवारी २९ डिसेंबर रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन शनिवारी २८ डिसेंबर रोजी रात्री गुरुग्राममधील तिच्या मैत्रीण नितिकाच्या घरी गेली होती. त्या ठिकाणी आणखी काही मैत्रिणी उपस्थित होत्या आणि सर्वांनी एकत्र पार्टी केली. पार्टीदरम्यान संगीत, जेवण आणि गप्पा सुरू होत्या. प्राथमिक चौकशीत कोणताही वाद, भांडण किंवा संशयास्पद प्रकार घडल्याचे आढळून आलेले नाही. रात्री उशिरा पार्टी संपल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र रविवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास सिमरनची अचानक प्रकृती बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिने तातडीने आपल्या मैत्रिणींना मदतीसाठी हाक दिली. कोणताही विलंब न करता मैत्रिणींनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सिमरनच्या व्हिसेराचे नमुने मधुबन येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील सत्य स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पार्टीदरम्यान काय घडले, कोणते पदार्थ सेवन करण्यात आले आणि मृत्यू नैसर्गिक की अन्य कारणांमुळे झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत. या गूढ मृत्यूमुळे सिमरनच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, गुरुग्राममध्येही चर्चेला उधाण आले आहे.