जागावाटपावर नाराजी; आठवलेंनी ३९ उमेदवार केले जाहीर

30 Dec 2025 16:03:27
मुंबई,
Athawale announced 39 candidates मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत स्पष्ट भूमिका न घेतल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने मुंबईतील तब्बल ३९ वॉर्डांमध्ये स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी मुंबईतील गणित अधिक गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत.
 
 
 
Athawale announced
रामदास आठवले यांनी महायुतीकडून आपल्याशी सातत्याने टाळाटाळ केली गेल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून कोट्यातून काही जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रिपाईला स्थान देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने रिपाईने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील अनेक भागांमध्ये आंबेडकरी आणि दलित समाजावर रामदास आठवले यांचा प्रभाव आहे. आतापर्यंत हा मतदारवर्ग मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने राहिला होता. मात्र आता रिपाईचे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्याने दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका भाजप आणि शिंदे गटाला बसू शकतो. महानगरपालिका निवडणुकीत काही वॉर्डांमध्ये शंभर-दोनशे मतेही निकाल बदलू शकतात, त्यामुळे रिपाईचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
रिपाईने जाहीर केलेल्या यादीत दक्षिण, उत्तर, उत्तर-पश्चिम, ईशान्य आणि उत्तर-मध्य मुंबईतील अनेक वॉर्डांचा समावेश आहे. महिला आणि युवक उमेदवारांना संधी देत पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. आता या घडामोडीनंतर भाजप आणि महायुती रिपाईला पुन्हा सोबत ठेवण्यासाठी काही राजकीय तोडगा काढतात का, की रिपाई स्वतंत्र वाटचाल कायम ठेवते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा निर्णय कोणाचे पारडे जड करणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0