मुंबई हादरली: भांडुपमध्ये बस गर्दीत शिरल्याने चार ठार

30 Dec 2025 09:45:46
मुंबई,
Bus accident in Bhandup मुंबईतील भांडुप परिसरात घडलेल्या भीषण बस अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रस्त्याच्या कडेला एका दुकानासमोर उभे असलेले नागरिक क्षणात काळाच्या जबड्यात सापडले. नियंत्रण सुटलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने थेट गर्दीत घुसत अनेकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात तीन महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आणखी नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले असून मृतकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
bhandup
 
समोर आलेल्या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये काही नागरिक भांडुपमधील एका साडीच्या दुकानाबाहेर उभे राहून गप्पा मारताना दिसतात. त्याच वेळी अचानक वेगात आलेली बस वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटतो आणि बस थेट लोकांच्या दिशेने जाते. काही जण प्रसंगावधान राखून दुकानात धाव घेत आपला जीव वाचवतात, मात्र काहींना पळण्याची संधीच मिळत नाही आणि बस त्यांना धडक देते. काही क्षणांतच रस्त्यावर गोंधळ आणि आरडाओरड सुरू होते. ही दुर्घटना सोमवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास भांडुप स्टेशनबाहेरील परिसरात घडली. वळण घेत असताना बस अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात इतका भीषण होता की बसने रस्त्यालगत असलेला लोखंडी वीजखांबही वाकवला, यावरून धडकेची तीव्रता स्पष्ट होते.
 
 
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0