काँग्रेस व भाजपात उमदेवारीसाठी जोरदार राडा!

30 Dec 2025 20:34:24
चंद्रपूर,
chandrapur-municipal-corporation-election : चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी काँगे्रस आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. जोरदार रस्सीखेच, गोंधळ, आक्रोश, आणि गटबाजीचे उघड दर्शन आणि बरेच काही घडले. काँगे्रसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील शीतयुध्दात खा. धानोरकर सरस ठरल्या. तिकिट वाटपात त्यांच्याच वरचष्मा राहिला, तर आ. वडेट्टीवार यांच्या समर्थक माजी नरसेवकांना डिच्चू मिळाला. अखेर वडेट्टीवार चिडून बैठक सोडून घरी गेले.
 
 
 
chand
 
 
 
तर, भाजपातही यंदा मोठी रस्सीखेच होती. आ. सुधीर मुनगंटीवार व आ. किशोर जोरगेवार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत पक्षाचे वरिष्ठही हतबल दिसले. ज्या हॉटेलातून उमेदवारांना एबी फार्म वाटल्या जात होता, तेथे एकच गोंधळ उडाला. नाराज चंद्रकला सोयाम यांनी मोठाच राडा केला. उमदेवारी न मिळाल्याने त्यांनी निरीक्षकांची गाडी रोखली. जोरगेवार यांच्यावर रोष व्यक्त केला. तर अजय सरकार व पूजा पोतराजे यांच्या उमेदवारीवरून आ. जोरगेवार चिडलेले दिसले.
 
 
 
तिकडे काँगे्रसमध्ये आ. विजय वडेट्टीवार यांचे समर्थक, माजी शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, सुनिता लोढीया, विना खनके, सकिना अंन्सारी यांच्यासारख्या दिग्गजांचे तिकीट कापल्या गेले. जनविकास सेनेशी आघाडी करीत असताना, सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या प्रमुख अटीनुसार, काँगे्रसच्या प्रदेश पदाधिकारी सुनिता लोडिया यांचे नावच काँगे्रसच्या उमदेवारी यादीतून उडवण्यात आले आणि त्यांच्या जागा जनविकास सेनेच्या मनिषा बोबडे यांना उमेदवारी देण्यात आली. थोडक्यात, काँग्रेसच्या तिकीट वाटपात खा. प्रतिभा धानोरकर यांचाच बोलबाला राहिला. तर, आ. वडेट्टीवार यांना त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात सपेशल अपयश आले. काँग्रेस पक्षातील या गोंधळाने कार्यकर्ते चांगलेच संतापले होते.
काँगे्रसची यादी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आली, जेणेकरून बंडखोरी होवू नये आणि अखेरच्या क्षणी वडेट्टीवार समर्थकांना डिच्चू देता यावा, तसे घडलेही. समर्थकांची उमेदवारी कापताना वडेट्टीवार एक शब्दही बोलले नाही. उलट घरी येवून झोपून गेले असा आरोप करीत, असा नेता काय कामाचा, अशी तिखट प्रतिक्रिया उमेदवारी न मिळालेल्यांनी व्यक्त केली.
 
 
तर दुसरीकडे, भाजपात उमेवारी न मिळाल्याने चंद्रकला सोयाम मोठा थयथयाट केला. आ. जोरगेवार यांनी त्यांची बाजू घेत पूजा पोतराजे यांच्या उमेदवारीचा जाहीर विरोध केला. भाजपातही विशाल निंबाळकर, प्रज्ज्वलंत कडू, राजेंद्र अडपेवार, राजेंद्र गांधी, शीला चव्हाण आदींची तिकीटे कापल्या गेली. पूजा पोतराजे आणि अजय सरकार यांच्या उमदेवारीबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली आणि त्यांना तिकीट दिल्या जाणार नाही, अशी आशा आ. जोरगेवार यांनी व्यक्त केली. तर एका उमदेवाराने हॉटेलातच अन्य महिला नेत्याला दोष देत, तुमच्यामुळेच माझी तिकीट कटली म्हणून जोरजोरात गोंधळ घातला.
भाजपा व काँगे्रस या दोन्ही पक्षांत या सार्‍या गोंधळाने मोठी बंडखोरी होण्याचे चित्र स्पष्ट झाले असून, येत्या काळात पक्षश्रेष्ठी त्यावर काय तोडगा काढतात, हे बघण्यासारखे आहे.
Powered By Sangraha 9.0