डाबो पब हत्याकांडातील जखमी युवकाचाही मृत्यू

30 Dec 2025 20:51:56
अनिल कांबळे
नागपूर, 
dabo-pub-murder-case : ख्रिसमसनिमित्त दाबो पबमधील पार्टीत मैत्रिणीची छेडखानी केल्याने दोन गटात हाणामारी झाली. वादानंतर रस्त्यावर एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रणय नरेश रनावरे (28, रा. महाल) याचा जागीच मृत्यू झाला तर गौरव ब्रीजलाल कारडा (32, चिखली, कळमना) हा गंभीर जखमी झाला होता. गौरवचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.
 
 

murder 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईड चौकात दाबो क्लब आहे. ख्रिसमसनिमित्त 25 डिसेंबरला रात्री या क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी सहभागी झाले होते. प्रणय, गौरव आणि त्यांचे मित्र देखील पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच त्यांनी मुंबईवरुन बोलावलेल्या तरुणीशी नृत्य करीत होते. ती तरुणी दोन दिवसांपासून नागपुरात असून गुरुवारी रात्री दहा वाजता विमानतळ चौकातील दाबो पबमध्ये गेले. ठाणेदार मगर यांनी तरुण भारतला दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर ती तरुणी प्रणय आणि गौरवसोबत नृत्य करीत असताना पाच जणांच्या टोळीतील मेहुल रहाटे आणि हनी ऊर्फ तुषार अनिल नानकानी (रा. कामठी) या दोघांनी दारुच्या नशेत असलेल्या तरुणीशी अश्लील चाळे केले.
 
 
त्यांना प्रणयने विरोध केला असता त्यांच्यात मारामारी झाली. त्यामुळे पब संचालकांनी त्या दोन्ही टोळींना पबबाहेर जाण्यास सांगितले. गौरव आणि प्रणय यांनी मेहुल आणि हनी यांना मारहाण केली. त्यांनी कारमधून शस्त्र काढून दोघांवरही प्राणघातक हल्ला केला. यामध्ये प्रणयचा जागीच मृत्यू झाला तर गौरवच्या पोटात घाव लागल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होता. आज मंगळवारी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी डबल मर्डरचा गुन्हा दाखल केला. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात सौम्य धर्मेंद्र देशमुख, मेहुल रहाटे, गप्पू शर्मा, राजीव चावला, अभय इमतानी आणि तुषार नानकानी यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0