नागपूर,
Discontent in Nagpur BJP महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रभाग 16 डमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळली असून, अनेक स्थानिक नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. प्रभागातील अनेक अनुभवी कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांनी उमेदवारीसंबंधी निर्णयावर असंतोष व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये प्रमुख नावांमध्ये प्रभाग 16 ड अध्यक्ष गजानन निशितकर, महामंत्री पराग जोशी, बूथप्रमुख राजीव रोडी, मुकुंद बंगाले, राहुल जोशी, अमोल वटक, साधना शुक्ला, शरद राठी, शक्ती केंद्र प्रमुख हेमंत कुळकर्णी, अध्यक्ष ओबीसी आघाडी अजय गाडगे यांचा समावेश आहे. नागपूर भाजपा अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याकडे दिले असून ते स्वीकारले की नाही अद्याप समोर आले नाही.
सर्वांनी आपल्या राजीनाम्यात असा इशारा दिला आहे की, प्रभागातील योग्य उमेदवारांना डावलून, त्यांच्या अनुभव, कार्यपद्धती आणि पारंपरिक योगदानाचा विचार न करता, बाहेरून आलेल्या आणि प्रभागाशी अपरिचित व्यक्तींना उमेदवारी देणे प्रभागासाठी अत्यंत हानिकारक ठरेल. या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये विश्वासघात आणि असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितले की प्रभागातील परिस्थिती आणि लोकसंपर्क याविषयी अनुभव नसलेले उमेदवार प्रभागाचे हित जपू शकणार नाहीत. यामुळे राजीनाम्यांचा निर्णय घेणे अनिवार्य ठरले.
या राजीनाम्यांमुळे जोरदार चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या राजीनाम्यांमुळे प्रभाग 16 डमध्ये निवडणुकीच्या तयारीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, प्रभाग 16 डमधील नाराजी ही फक्त व्यक्तिगत मतभेदाचे स्वरूप नाही, तर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, स्थानिक अनुभव आणि कार्यपद्धतीसंबंधी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडे आता या नाराजीची दखल घेण्याची आणि योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.