मैत्रीचे नाते निभावत भारत-चीन रशियाच्या पाठीशी

30 Dec 2025 15:22:09
नवी दिल्ली,
India-China stand with Russia रशिया-युक्रेन युद्धाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत ९१ ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र युक्रेनने हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी एकाच सुरात या घटनेचा तीव्र निषेध करत संयम राखण्याचे आवाहन केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वृत्तांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून, कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले. संघर्षाचा मार्ग हिंसाचार नसून संवाद आणि राजनैतिक तोडगाच असल्याचे सांगत, परिस्थिती आणखी चिघळवू शकणाऱ्या कृती टाळण्याचे आवाहन भारताने सर्व संबंधित पक्षांना केले आहे.
 

jingping 
 
या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, शत्रुत्व थांबवण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. शांतता प्रक्रियेला बाधा आणणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, चीननेही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली असून, बीजिंग सध्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत तणाव वाढवणाऱ्या कोणत्याही हालचाली टाळणे आवश्यक असल्याचे चीनने म्हटले आहे. राजनैतिक संवाद हाच एकमेव मार्ग असून, अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिकच नव्हे तर जागतिक पातळीवरही अस्थिरता वाढू शकते, असा इशाराही चीनने दिला आहे. या घडामोडींमुळे रशिया-युक्रेन संघर्ष अधिक गंभीर टप्प्यात जात असल्याचे चित्र असून, भारत आणि चीनसारख्या देशांनी दिलेला इशारा आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0