अनिल कांबळे
नागपूर,
Mock drill at the polling station आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गड्डीगाेदाम परिसरात साेमवारी अचानक गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले. माेहननगर येथील सेंट जाॅन्स हायस्कूलच्या परिसरातील मतदान केंद्रावर बाेगस मतदानाच्या मुद्द्यावर दाेन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती पसरताच तणाव निर्माण झाला. मतदान केंद्रात उपस्थित मतदार घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. दंगलसदृश परिस्थितीची माहिती मिळताच पाेलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आणि काही वेळातच संपूर्ण परिसर पाेलिस छावणीत रूपांतरित झाला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ही माॅकड्रील असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अचानक झालेल्या पाेलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. पाेलिसांनी काेंबिंग ऑपरेशन व रूट मार्च केला.

सायंकाळी सुमारे 6.15 वाजता मतदान केंद्रावर बाेगस मतदानामुळे गाेंधळ झाल्याची माहिती मिळताच सदर ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अमाेल देशमुख यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाèयांना कळविले. 10 ते 15 मिनिटांतच पाेलिस पथकासह घटनास्थळी दाखल हाेऊन परिस्थिती आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती बिघडू शकते, हे लक्षात घेऊन पाेलिस कंट्राेल रूमकडून अतिरिक्त बंदाेबस्त मागविण्यात आला. त्यानुसार मानकापूर, अंबाझरी, सीताबर्डी व गिट्टीखदान पाेलिस ठाण्यांतील पाेलिसांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. दंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले.
संभ्रमाचे वातावरण
पाेलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पाेहाेचले. सायरनचा आवाज, माेठ्या संख्येने पाेलिसांची उपस्थिती व जलद हालचाली पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अनेकांना प्रत्यक्ष दंगल उसळल्याचा भास झाला. मात्र, काही वेळातच परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली. त्यानंतर ही प्रत्यक्ष घटना नसून, आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली माॅकड्रिल असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. घटनास्थळावर अन्य पाेलिसांच्या तुलनेत मानकापूर पाेलिस उशिरा पाेहचल्याचे समाेर आले.