नवी दिल्ली,
Priyanka Gandhi's son's wedding काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या कुटुंबात लवकरच आनंदाचा सोहळा रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दाम्पत्याचा मुलगा रेहान वाड्रा याचे त्याच्या दीर्घकाळच्या प्रेयसीशी लग्न ठरले असून, घरात लग्नाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. रेहान वाड्रा आणि अविवा बेग यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांनी संमती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहान आणि अविवा हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून, नुकतेच रेहानने अविवाला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. अविवाने हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली आणि या नात्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता त्यांच्या साखरपुड्याची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाड्रा कुटुंबाची भावी सून अविवा बेग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अविवा आणि तिचे कुटुंब दिल्लीचे रहिवासी असून, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर दोन्ही बाजूंनी चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र, साखरपुडा आणि लग्नाच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, गांधी-वाड्रा कुटुंबातील या घडामोडीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या कुटुंबात लवकरच नवा सदस्य येणार असल्याने समर्थकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. अधिकृत घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.