नवी दिल्ली,
Severe cold wave in North India नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट जाणवत असून, दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सकाळच्या वेळी दृष्यमानता मोठ्या प्रमाणात घटली असून, अनेक ठिकाणी थंड दिवसांचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशात सकाळच्या वेळी दाट ते अतिदाट धुके पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेशात १ जानेवारी २०२६ पर्यंत धुक्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याने इशारा दिला आहे की १ जानेवारीपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, उत्तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडू शकते. तसेच ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर आणि नागालँडमध्ये ३ जानेवारीपर्यंत धुक्याचा प्रभाव जाणवणार असून, या राज्यांसाठी थंड दिवसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतातील मैदानी भागात कडाक्याची थंडी जाणवत असून, हरियाणातील हिसार येथे देशातील सर्वात कमी किमान तापमान २.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मध्य प्रदेश, उत्तर राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, मराठवाडा, छत्तीसगड आणि सिक्कीममध्ये किमान तापमान ५ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
दरम्यान, पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद परिसरात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याच कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागातही पाऊस आणि बर्फ पडू शकतो. तसेच ३० डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड आणि पश्चिम राजस्थानमध्ये, तर १ जानेवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर ३० व ३१ डिसेंबरदरम्यान जोरदार वारे, गडगडाटी वादळे आणि विजांसह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
दिल्ली-एनसीआरबाबत बोलायचे झाल्यास, पुढील २४ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून सकाळच्या वेळी अनेक भागांत हलके तर काही ठिकाणी दाट धुके पडेल. राजधानीत कमाल तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ७ ते ९ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळी पश्चिम-उत्तर दिशेने मंद गतीने वारे वाहतील. नववर्षाच्या दिवशीही हवामानात फारसा बदल होणार नसून, आकाश अंशतः ढगाळ राहील आणि दिल्ली-एनसीआरच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.