यवतमाळ नगर परिषदेत ‘ठरलं’ भाजपासह प्रहार, बसपा अन् अपक्षाची आघाडी

30 Dec 2025 18:47:15
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-municipal-council : यवतमाळ नगर परिषदेत भाजपाने सत्ता स्थापनेच्या दिशेने ठोस पावले टाकत आपले संख्याबळ भक्कम केले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष, अपक्ष तसेच बसपाच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आल्याची नोंद जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे करण्यात आली आहे. या आघाडीचे गटनेते म्हणून भाजपामधील ज्येष्ठ नगरसेवक नितीन गिरी यांची निवड करण्यात आली.
 
 
ytl
 
नगर परिषदेत भाजपाकडे सर्वाधिक 28 नगरसेवक, नगराध्यक्ष असे 29 चे संख्याबळ आहे. आता आघाडीमध्ये प्रहारचे दोन सदस्य, बसपा आणि अपक्ष प्रत्येकी एक असे चार सदस्यांचे समर्थन घेऊन आघाडी तयार केली आहे. तर काँग्रेसकडे 15 नगरसेवक आहेत. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेकडे सात नगरसेवक आहेत. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे तीन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. आता संख्याबळात 32 नगरसेवक विरुद्ध 26 असे चित्र निर्माण झाले आहे.
 
 
त्यातही नगराध्यक्ष भाजपाचा असल्याने भाजपाला त्यांचे मत मिळणार आहे. त्यामुळे सभागृहातील कुठलाही ठराव 33 विरुद्ध 26 अशा मतांनी पारित होणार आहे. यवतमाळ नगर परिषदेत महायुतीतील शिंदेसेनेने स्वतंत्र लढत दिली. निवडणुकीनंतर भाजपा व शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापना करेल. असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात सत्तेबाबतचे गणित जुळले नाही. मोठे संख्याबळ असलेल्या भाजपाला सत्तेत भागीदार नको, बिनशर्त सोबत येणाèयांनाच घ्यायचे असे ठरल्याने प्रहार, बसपा व अपक्ष यांची साथ लाभली. यातील अपक्ष उमेदवार भारत ब्राह्यणकर हे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविली. भाजपाचे शहर महामंत्री म्हणून ते कार्यरत होते. निवडणूकीनंतर ब्राह्मणकर भाजपासोबतच जाणार हे स्पष्ट होते.
 
 
आता 33 चे संख्याबळ असल्याने भाजपाला निर्णय प्रक्रियेत कुठेही अडथळा येणार नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. भाजपा जिल्हा कार्यालयात सोमवारी दुपारी आघाडी व गटनेता निवडीची प्रक्रिया झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चौहान, नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, महामंत्री राजू पडगिलवार, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0