तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ravindra-bhusari : रामभाऊ एक कर्मठ, निष्ठावान स्वयंसेवक असून ते संघ जगले. संघ शिस्त स्वत:पुरती न ठेवता पूर्ण परिवारात वाढविली, जोपासली, रुजवली. समरसता, त्यागाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ प्रचारक रवींद्र भुसारी यांनी केले. येथील ज्येष्ठ स्वयंसेवक रामभाऊ महानूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सहकार भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रवींद्र भुसारी पुढे म्हणाले, आपल्या सर्वाचे भाग्य की आपल्याला याची देही याची डोळा संघ शताब्दी अनुभव घेत आहोत. अशा वेळेस रामभाऊंचा अमृत महोत्सव म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. आज रामभाऊंची चौथी पिढी संघ कार्यात अग्रेसर आहे. याप्रसंगी रामभाऊ यांची साखरतुला आणि पशुखाद्य तुला करण्यात आली. तसेच विविध सामाजिक संस्थांना मंगलनिधी प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन संजय दंडे यांनी, तर आभारप्रदर्शन शितल महानुर यांनी केले. श्वेता महानुर यांनी रामभाऊंच्या घर व संघातील कौतुकास्पद घडामोडी वर्णन केल्या. तसेच पुतणे हर्षल यांनी मोठे बाबा आमच्या कसे पाठीशी उभे राहतात हे सांगितले. त्यांचे बंधू सतीश महानुर व मिलिंद पांडे यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. वैयक्तिक गीत शशांक गौतमे यांनी सादर केले. रामभाऊंची मुले महेंद्र आणि अभय, मुली व त्यांच्या मूळ नांदुरा गावातील परिवार आणि चाहते हजर होते.
रामभाऊंची नात पृथ्वी हिने आपल्या आबांसाठी स्वरचित एक सुंदर कविता सादर केली. विभाग संघचालक विजय कोषटवार, नवनिर्वाचित यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासह रामभाऊंचे नातेवाईक व आप्त परिवार, यवतमाळातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संपूर्ण महानुर व संघ परिवारातील सदस्यांनी परिशम घेतले.