वॉशिंग्टन,
2026: War between India and Pakistan वॉशिंग्टनमधील एका प्रभावी अमेरिकन विचारमंचाने भारत आणि पाकिस्तानबाबत गंभीर इशारा दिला असून, २०२६ साली दोन्ही देशांमध्ये थेट युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. द कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (CFR) या नामांकित थिंक टँकने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियामधील वाढती दहशतवादी हालचाल आणि सातत्याने निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण हे भविष्यातील सशस्त्र संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमधील वाद कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. यासोबतच जगातील इतर संघर्षग्रस्त भागांमध्येही मध्यस्थी करण्याचा अमेरिका प्रयत्न करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, गाझा पट्टी, युक्रेन, भारत-पाकिस्तान तसेच कंबोडिया आणि थायलंड या भागांतील संघर्षांचा त्यात समावेश आहे.

या अहवालात यावर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अल्पकालीन युद्धसदृश परिस्थितीचीही आठवण करून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. या घटनेनंतर भारताने कडक पावले उचलत ६ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या मोहिमेत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत मोठी कारवाई केली आणि अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला.
यानंतर ७ ते १० मेदरम्यान पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून भारतातील लष्करी तसेच नागरी ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले. भारताच्या ठोस प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर दबाव वाढला आणि अखेर १० मे रोजी दोन्ही देशांतील लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये थेट संवाद झाला. या चर्चेनंतर नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि लष्करी हालचाली थांबवण्यावर सहमती झाली. CFR च्या अहवालात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाचाही सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये सीमावाद उफाळून आला होता. पाकिस्तानने टीटीपीचा नेता नूर वली मेहसूदला लक्ष्य करण्यासाठी काबूलवर हवाई हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. या कारवाईला अफगाणिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्याने परिस्थिती आणखी बिघडली. या पार्श्वभूमीवर २०२६ मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही मर्यादित स्वरूपाचा संघर्ष उद्भवू शकतो, असे संकेत या अहवालात देण्यात आले आहेत.