वरूड तालुक्यात पुन्हा धर्मांतरणाचा प्रयत्न

31 Dec 2025 21:27:41
वरूड, 
attempt-at-religious-conversion : तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे हद्दीतील पडसोडा गावात हिंदू धर्मातील अंकुश भीमराव बोरवार याला १९ जूलै रोजी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या या धर्मांतरणाचा भांडाफोड झाल्यानंतर २० जुलैला याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. परंतु, याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने २५ जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने बेनोडा पोलिस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदार विवेक देशमुख यांना निवेदन दिले होते. असाच प्रकार ३० डिसेंबर रोजी पुन्हा बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
 
 
 
amt
 
 
 
धर्मप्रसार करणार्‍यांकडून पुन्हा तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणी नजिक असणार्‍या ग्राम शिंगोरी येथे ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गावात वाढदिवसाच्या नावाने ख्रिश्चन धर्माचे पादरी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करीत होते. हिंदू धर्माला शिव्या देत होते आणि तेथील लोकांना पैश्याचे प्रलोभन देऊन ख्रिश्चन धर्मात सामील व्हा असा संदेश देत होते, हि बाब लोणी परिसरातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांच्या काणी पडताच त्यांनी शिंगोरी गाठली व त्यांचा डाव उधळून लावला. बेनोडा पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली, तेव्हा ठाणेदार विवेक देशमुख त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सकल हिंदू समाजाच्या मागणीनुसार सदरील लोकांविरुद्ध ठाणेदार देशमुख यांनी तक्रार दाखल करून घ्यावी असे सांगितल्या नंतरही पोलिस तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच विश्व हिंदू परिषद बजरंग दल व पोलिसांमध्ये वाद-विवाद झाला. त्यानंतर स्थानिक आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी पोलिस स्टेशन गाठले व ठाणेदारांना धारेवर धरले. लक्ष्मण शेंडे रा. शिंगोरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून घेतली व सर्व आरोपींताना अटक सुद्धा करण्यात आली आहे.
 
 
खपून घेणार नाही : आ. यावलकर
 
 
आ. यावलकर यांनी पोलिस प्रशासनाला ठणकावून सांगितले की, असे प्रकार जर माझ्या मतदारसंघात झाले तर खपून घेणार नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत रितसर तक्रारारीची प्रत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. यावेळी नितीन कुबडे, निखिल बोडखे, योगेश अडलक, सुकेश भोपती, पवन साखरे, मॉन्टी नागदेवे, अतिश कालबेडे, जय वडस्कर यांच्यासह सकल हिंदू समाजाचे अन्य कार्यकर्ते ठाण्यात उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0