चंद्रपूर,
subhash-kasangottuwar : चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टीत तडकाफडकी मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपा चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र बुधवार, 31 डिसेंबर रोजी प्रदेश कार्यालय सचिव मुकूंद कुळकर्णी यांनी जारी केले आहे. 29 डिसेंबर रोजी आलेल्या भाजपा उमेदवारांच्या अधिकृत यादीतील 9 जणांची नावे परस्पर बदलवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रदेश कार्यालयातून आलेल्या अधिकृत यादीतील उमदेवार बदलूनआपल्या मर्जीतील अन्य उमदेवारांना एबी फार्म वाटले. त्यात पैश्याचाही गैरव्यवहार झाला, असा खळबळजनक आरोप ज्यांची तिकीट कापली गेली ते सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, विशाल निंबाळकर, माया उईके यांनी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी येथे पत्रपरिषदेत केला.
29 डिसेंबरला सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे आलेल्या उमेदवारांच्या अधिकृत यादीत प्रभाग 1 च्या माया उईके, प्रभाग 2 चे सुनील डोंगरे, प्रभाग 3 च्या पूजा पोतराजे, प्रभाग 4 चे अजय सरकार, प्रभाग 10 च्या शुभांगी दिकोंडवार, मनिष बावणे, प्रभाग 13 चे कुणाल गुंडावार, प्रभाग 14 च्या पंचशीला चिवंडे व प्रभाग 15 चे हरीश मंचलवार यांचे नाव होते. परंतु, आ. जोरगेवार आणि सुभाष कासनगोट्टूवार यांनी शेवटपर्यंत या उमदेवारांना एबी फार्म दिलाच नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून उमदेवारी दाखल करावी लागली. त्या जागी त्यांच्या मर्जीतील अन्य उमदेवारांची नावे टाकून दुसरीच यादी जाहीर केली आणि त्यांना एबी फार्म दिला गेला गेला, असा आरोप यावेळी लावण्यात आला.
सुनील डोंगरे म्हणाले, शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 येथून माझ्या उमदेवारीची घोषणा झाली असल्याची भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्राची प्रत मला प्राप्त झाली. परंतु, नाम निर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंतच्या पक्षाचे एबी फॉर्म मला देण्यात आले नाही. मला झुलवत ठेवले गेले. कारण माझा एबी फॉर्म दुसर्या उमेदवारास देण्यात आला. ज्यांना देण्यात आला त्यांचे नाव महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून आलेल्या यादीत नव्हते. प्रदेश अध्यक्षांनी मंजूर केलेल्या उमदेवारांच्या यादीला कासगोट्टीवार यांनी केराची टोपली दाखवली आणि स्वतःच्या मर्जीतील उमेदवारांना उमेदवारी दिली. पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी डोंगरे यांनी पत्रपरिषदेत केली.
यादीतील नावे मी नाही बदलवलेः सुभाष कासनगोट्टूवार
उमदेवारांच्या यादीतील नावे मी बदलवलेले नाही. तो माझा अधिकार नाही. ती नावे निरीक्षक चैनसुख संचेती, प्रभारी अशोक नेते यांनी बदलवले आहे. आ. किशोर जोरगेवार आणि राहुल पावडे यांच्या परस्पर संवादातून यादीत काही बदल करण्यात आले. मी स्वतः उमेदवार असल्याने मला तात्पुरते पदमुक्त केले गेले आहे, असे स्पष्टीकरण सुभाष कासनगोट्टूवार यांनी दिले.