डोंबिवली,
BJP's victory even before the municipal elections. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच आपले खाते उघडले आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी यांचा हा दुसरा कार्यकाळ असणार आहे, तर आसावरी नवरे यांची ही पहिली टर्म आहे. प्रभाग १८ अ मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यांच्या विरोधात कोणतीही उमेदवार न आल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. तसेच, पॅनल क्रमांक 26 (क) मधून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आसावरी केदार नवरे यांच्यासमोरही कोणताही विरोधक उभा राहिला नाही, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी स्पष्ट केले की प्रभाग १८ अ मधील मागास प्रवर्ग महिला जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज आला असून, त्यामुळे भाजप महापालिका निवडणुकीत पहिला विजय आधीच नोंदवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय म्हणून अधिकृतपणे नोंदवला गेला आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या असून, भाजपच्या कल्याण विभागातील महिला मोर्चाची जिल्हाध्यक्ष आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्यास होता. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या महानगरपालिकांमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय हायव्होल्टेज परिस्थिती पाहायला मिळाली. उमेदवार आता 2 जानेवारीपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होईल आणि 16 जानेवारीला सर्व 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.