ट्रम्पनंतर चीनचा दावा म्हणे...आमच्यामुळे भारत-पाक युद्धबंदी!

31 Dec 2025 09:42:19
बीजिंग,
China claims India-Pakistan ceasefire पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रेय घेण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारत–पाकिस्तानमधील युद्धबंदी आपण घडवून आणल्याचा दावा केला होता. भारताने हा दावा सातत्याने फेटाळून लावला असतानाच आता चीननेही या प्रक्रियेत मध्यस्थी केल्याचा दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करत आक्रमक पवित्रा घेतला होता. या कारवाईत तिन्ही भारतीय सैन्यदलांनी संयुक्तपणे पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ले केले. ही सर्व ठिकाणे लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांची आश्रयस्थाने असल्याचे भारताने स्पष्ट केले होते. भारताच्या या निर्णायक कारवाईनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने बहुतेक हल्ले यशस्वीपणे निष्फळ ठरवले.
  
India-Pakistan ceasefire
 
 
या घडामोडीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला असताना अखेर युद्धबंदीवर सहमती झाली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार आपणच भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला असल्याचा दावा केला. मात्र भारत सरकारने स्पष्ट भूमिका घेत ही युद्धबंदी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीमुळे नव्हे, तर पाकिस्तानच्या पुढाकाराने दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) झालेल्या थेट चर्चेमुळे झाली असल्याचे सांगितले. आता या वादात चीनची भर पडली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बीजिंगमध्ये आयोजित एका परिसंवादात बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा या वर्षी चीनने मध्यस्थी केलेल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्द्यांपैकी एक असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता वाढत असून अनेक ठिकाणी स्थानिक युद्धे आणि सीमापार संघर्ष उफाळून आले आहेत. अशा परिस्थितीत चीनने तर्कसंगत आणि सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारत विविध संवेदनशील प्रश्नांमध्ये मध्यस्थी केल्याचे वांग यी यांनी नमूद केले. त्यांनी भारत-पाकिस्तान तणावासह उत्तर म्यानमार, इराणी अणुप्रश्न, पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष तसेच कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षांचा उल्लेख केला.
मात्र भारताने चीनचा हा दावा देखील अप्रत्यक्षपणे फेटाळला आहे. भारताची भूमिका कायम आहे की भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला स्थान नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर झालेली युद्धबंदी ही पूर्णपणे द्विपक्षीय लष्करी चर्चेचा परिणाम असल्याचे भारताने पुन्हा स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाकिस्तानला दिलेल्या लष्करी मदतीमुळे आणि त्याच्या उघड पाठिंब्यामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे. अशा परिस्थितीत युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा चीनचा प्रयत्न हा केवळ राजनैतिक डावपेच असल्याचे मत अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत.
Powered By Sangraha 9.0