‘सॉरी फॅमिली मी तुमचा आधार नाही बनू शकलो...’

31 Dec 2025 19:00:56
तभा वृत्तसेवा
पुसद, 
death-post-young-mans-suicide : 10 किमी अंतरावरील हुडी येथे एका 18 वर्षीय तरुणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मिडिया अकाउंटवर, ‘सॉरी फॅमिली मी तुमचा आधार नाही बनू शकलो..’ असा संदेश, स्वतःचा फोटो लावून त्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृत्यूची वेळसुद्धा लिहिली होती.
 
 
 
hoodie
 
 
 
पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे, शिवराज रामराव दोडके (वय 18) राहणार हुडी (बु) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या तरुणाने राहत्या घरातील लाकडाच्या बल्लीला पांढèया शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
 
गळफास घेतला असल्याचे घरात असलेल्या शिवराज याचे आजीने बघितले. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. हुडी बुद्रुक येथील पोलिस पाटील दिनेश हरणे यांनी दुपारी 2 च्या सुमारास या घटनेची माहिती, पुसद ग्रामीण पोलिसांनी दिली.
 
 
शिवराज आजीबरोबर राहत होता. त्याचे आईवडील पुणे येथे कामाला आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली होती. त्यामध्ये ‘सॉरी फॅमिली मी तुमचा आधार नाही बनू शकलो.. कायम आमच्या हृदयात राहशील.. मिस यु किंग.., शिवराम दोडके यांचे आज दुपारी 1 वाजता निधन झाले आहे. तर अंत्यविधी उद्या सकाळी 12 वाजून 35 मिनिटाला आहे. मुक्काम पोस्ट हुडी बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ.. भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज दोडके..’ अशा प्रकारची बॅनरसदृश्य पोस्ट त्याने, त्याच्या इन्स्टाग्रामवर ठेवली होती.
 
 
मात्र शिवराज दोडके याने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा प्राथमिक तपास, सहायक फौजदार किसन जाधव व पोलिस अंमलदार संतोष राठोड करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0