नवी दिल्ली,
ed-raids-in-delhi भारत आणि परदेशात भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन मोठ्या कारवाई केल्या आहेत. दिल्लीतील छाप्यात कोट्यवधी रुपये रोख आणि सोने जप्त करण्यात आले, तर लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेसजवळील एक आलिशान मालमत्ता देखील जप्त करण्यात आली.

प्रवर्तन निदेशालयाने ३० डिसेंबर रोजी दिल्लीतील सर्वप्रिय विहार परिसरात मोठी झडती मोहीम राबवली. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत इंद्रजीत सिंह यादव, त्याचे सहकारी, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड तसेच इतर संबंधित संस्था आणि व्यक्तींविरोधात करण्यात आली आहे.इंद्रजीत यादव याच्याविरोधात हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडे १५ हून अधिक एफआयआर आणि आरोपपत्रे दाखल आहेत. अवैध वसुली, शस्त्रांच्या जोरावर धमकावणे तसेच खासगी फायनान्सर्ससोबत जबरदस्तीने कर्ज सेटलमेंट करून मोठ्या प्रमाणावर कमिशन उकळल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शस्त्र अधिनियम १९५९, बीएनएस २०२३ आणि भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत दाखल असलेल्या या सर्व प्रकरणांच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात इंद्रजीत सिंह यादव आणि त्याचे सहकारीही तपासाच्या कक्षेत आहेत.
दरम्यान, दिल्लीतील सर्वप्रिय विहार येथील एका ठिकाणी ईडीने छापेमारी करत मोठी कारवाई केली. या कारवाईत ५.१२ कोटी रुपयांची रोकड, सुमारे ८.८० कोटी रुपयांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने असलेला एक सुटकेस, चेकबुकने भरलेली एक बॅग तसेच अंदाजे ३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही झडती मोहीम अद्याप सुरू आहे. याचवेळी, अंमलबजावणी संचालनालयाने युनायटेड किंगडममधील लंडन शहरात बकिंघम पॅलेसजवळील एका अतिशय मौल्यवान अचल मालमत्तेवरही कारवाई केली आहे. सुमारे १५० कोटी रुपयांची किंमत असलेली ही मालमत्ता नितीन शंभूकुमार कसलीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या कसलीवाल यांच्यावर भारतीय बँकांच्या समूहाची सुमारे १,४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून, या संदर्भात अनेक एफआयआर दाखल आहेत.