बुलढाणा,
giribala-sonune : कला क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्था असलेल्या एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश निश्चित झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या व्यक्ती डॉ. गिरीबाला सोनुने यांचा अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातून फक्त दोघांचीच निवड झाली असून त्यामध्ये डॉ. गिरीबाला यांचा समावेश आहे.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांची कन्या असलेल्या डॉ. गिरीबाला सोनुने यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर व्यवसाय न करता राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दरवर्षी देशभरातून केवळ २० विद्यार्थ्यांची निवड एनएसडीतर्फे करण्यात येते. अत्यंत कठीण प्रवेश प्रक्रियेतून स्वतःला सिध्द करीत डॉ. गिरीबाला यांचा प्रवेश निश्चित झाला. महाराष्ट्रातून निवड झालेल्या दोघांपैकी त्या एक आहेत तर जिल्ह्यातील पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत. नाट्यक्षेत्रासाठी अभिमानास्पद असलेल्या या घटनेबद्दल डॉ. गिरीबाला सोनुने यांचा अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे २९ डिसेंबर रोजी समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक सुरेश साबळे हे होते तर चित्रपट अभिनेते गणेश देशमुख व कवी प्रेषित सिध्दभट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. नटराज पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते आईवडीलांसह डॉ. गिरीबाला सोनुने यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक विजय सोनोने यांच्यासह जयंत दलाल, पंजाबराव आखाडे, प्रा. डॉ. स्वप्नील दांदडे, पराग काचकुरे यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाला लक्ष्मीकांत गोंदकर, अविनाश सोनोने, अभिलाष चौबे, मिनाक्षी सोनुने, विलास मानवतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरदेहचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी केले तर डॉ. जयेश चौधरी यांनी आभार मानले.