आजीची जुनी गोधडी होतेय कालबाह्य

31 Dec 2025 20:22:03
सतीश पापळकर
दारव्हा, 
cold-darwha : काही वर्षापूर्वी थंडीचे दिवस सुरू झाले की, ग्रामीण भागात आई, आजीने सुई, दोरा घेऊन हाताने शिवलेल्या साडी, लुगड्यांची गोधडी किंवा वाकळ बिछाना ठेवण्याच्या जागेवरून बाहेर काढल्या जात असायच्या, मात्र आता बदलत्या कालौघात आई, आजीच्या गोधडीची (वाकळीची) जागा आकर्षक नक्षीकाम केलेले मुलायमदार ब्लँकेट व दुलईने घेतली आहे. साहजिकच ऐन थंडीत आता गोधडीच्या माध्यमातून मिळणारी मायेची ऊब हरवल्याची जाणीव होऊ लागली. विशेष म्हणजे, हातानेच गोधडी शिवण्याचे काम करणाèया ग्रामीण भागातील महिलासुद्धा आता फारशा दिसत नाहीत.
 
 
 
ytl
 
 
ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी घरातील जुने वापरात नसलेली वस्त्रे, सहावारी, नऊवारी, साडी, लुगडं असेल तर ते वस्त्र फेकून किंवा जाळून टाकण्यापेक्षा या वस्त्राचा वापर आई किंवा आजी गोधडी शिवायच्या. जाडा धागा, लांब सुईने साडीचे चार फेरे किंवा त्यामध्ये आणखी काही वस्त्रांची भर टाकून, हाताने गोधडी (वाकळ) शिवण्याचे कसब घरातील महिलेला सहज करता यायचे. काम नसले किंवा काम कमी असलेल्या दिवशी हा वेळ कसा घालवायचा, याचा विचारही मनात न येता अशा रिकाम्या वेळेचाही सदुपयोग व्हायचा. गोधडी शिवण्याचे काम करताना जुन्या गोष्टी करीत हा वेळ निघून जायचा. आता अलीकडे घराघरात गोधडी दिसणं तसं, दुर्मिळच झालं आहे. आता तर आधुनिक युगातील नव्या पिढीला तर ही ‘गोधडी’ म्हणजे काय, हेच समजावून सांगावे लागत आहे.
Powered By Sangraha 9.0