किडनी रॅकेटचा तामिळनाडूतील स्टॉर किम्स हॉस्पीटलशी संबंध!

31 Dec 2025 18:55:23
चंद्रपूर, 
Kidney racket : अवैधरित्या किडनी प्रत्यार्पण प्रक्रिया करणार्‍या भारतातील दोन डॉक्टरांची ओळख स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाला पटली आहे. रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणाच्या तपासातून कंबोडियानंतर आता भारतातही किडनी रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले असून, त्यात तामिळनाडू राज्यातील त्रिचीच्या स्टॉर किम्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी, तर दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बुधवार, 31 डिसेंबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 

CHAND 
 
 
 
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकर्‍याने वेगवेगळ्या सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यात त्यांचे आर्थिक शोषण केल्या गेले. ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासात, रोशन कुळे यांनी त्यांच्या किडनीचे प्रत्यार्पण कंबोडिया येथे केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मुख्य आरोपी रामकृष्ण सुंचु उर्फ डॉ. क्रिष्णा व हिमांशु भारव्दाज यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत त्यांची चौकशी केली असताख या किडनी प्रत्यार्पण रॅकेटचा संबंध भारताशी जुळला असल्याचे समोर आले आहे. रोशन कुळे व त्यांच्या इतर साथीदारांना कंबोडिया येथे घेवून जाणारा आरोपी हिमांशू भारव्दाज यानेसुध्दा जुलै 2022 मध्ये आर्थिक अडचणीमुळे स्वतःची किडनी रामकृष्ण सुंचू याच्यामार्फत विकली होती. तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टॉर किम्स हॉस्पिटलचा संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी व दिल्ली येथील डॉ. रविंद्रपाल सिंग यांनी त्याची किडनी प्रत्यार्पण प्रक्रिया अवैधरित्या केली होती.
 
 
या गुन्ह्याच्या तपासाकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तामिळनाडू स्टॉर किम्स हॉस्पीटल येथे गेले असून, डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच दुसर्‍या पथकाने दिल्ली येथे डॉ. रवींद्रपाल सिंग याला ताब्यात घेतले होते. त्याला ट्रांझिट रिमांडसाठी दिल्ली येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 2 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूर मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, असेही मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले.
 
 
या किडनी रॅकेटमध्ये फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आतापर्यंत कंबोडिया येथील जाळे समोर आले होते. मात्र, आता तपासात भारतातील नामांकित हॉस्पिटल आणि डॉक्टर्स आणि दलालांही सहभाग उघड झाला आहे, अशी माहिती सुदर्शन यांनी दिली. पत्रपरिषदेला अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.
 
किडनीसाठी घेतले 80 लाख, तर विकणार्‍यास दिले केवळ 5 लाख!
 
 
तामिळनाडू राज्यातील त्रिचीच्या स्टॉर किम्स हॉस्पीटल झालेल्या अवैध किडनी प्रत्यारोपन प्रक्रियेत किडनी घेणार्‍या व्यक्तीकडून 50 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात होती. त्यातील 10 लाख रुपये आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याला व 20 लाख रुपये डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी याला सर्जरी व हॉस्पीटीलीटी उपलब्ध करुन देण्यासाठी दिले जात होते. दलाल आरोपी रामकृष्ण सुंचू यास व इतर लोकांना 20 लाख रुपये मिळत होते. मात्र, किडनी विकणार्‍या व्यक्तीस केवळ 5 ते 8 लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
Powered By Sangraha 9.0