जखमी अवस्थेतही लढले मेजर जैरी ब्लेज, ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा

31 Dec 2025 19:49:43
नवी दिल्ली,
Major Jerry Blaze : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेच्या शौर्याचे दर्शन संपूर्ण जगाने घेतले. देशाच्या धैर्यवान आणि जाबाज जवानांनी हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडत पाकिस्तानी सेनेला गुडघे टेकण्यास भाग पाडले. एका वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरचे नायक ७ आणि ८ मेच्या रात्री घडलेल्या घटनांचा सविस्तर तपशील मांडत अनेक महत्त्वाचे पैलू उघड केले. या कार्यक्रमात कर्नल कोशांक लांबा, लेफ्टनंट कर्नल सुशील बिष्ठ, नायब सूबेदार सतीश कुमार, नायब सूबेदार रत्नेश घोष आणि मेजर जैरी ब्लेज उपस्थित होते. यापैकी मेजर जैरी ब्लेज यांनी जखमी झाल्यानंतरही त्यांनी आणि त्यांच्या टीमने ऑपरेशन कसे सुरू ठेवले आणि पाकिस्तानला धूळ चारण्यात कसे यश मिळवले, याची थरारक माहिती दिली.
 
 

mejor 
 
 
ऑपरेशन सिंदूरदरम्यान मेजर जैरी ब्लेज ‘मेंशन इन डिस्पॅच’च्या ठिकाणापासून सुमारे २५० मीटर अंतरावर असताना पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू होता. पुंछ सेक्टरमध्ये भारतीय लष्करासोबतच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जात होते. जीवाची पर्वा न करता मेजर ब्लेज यांनी प्रत्युत्तर देत त्या गोळीबारातून पुढे जात रॉकेट लॉन्चरच्या मदतीने दहशतवाद्यांना आश्रय देणारी आणि भारतीयांना लक्ष्य करणारी शत्रूची पोस्ट पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या कारवाईदरम्यान ते जखमी झाले तरीही त्यांनी लढा सुरूच ठेवला. त्यांच्या या अदम्य धैर्यासाठी त्यांना ‘मेंशन इन डिस्पॅच’ या सन्मानाने गौरवण्यात आले.
 
मेजर ब्लेज यांनी सांगितले की, रॉकेट लॉन्चर फायर करताना शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात RPG चे स्प्लिंटर लागून त्यांच्या डाव्या हाताला आणि उजव्या जांघेला गंभीर दुखापत झाली. तरीही त्यांच्या कंपनीतील जवानांनी तात्काळ मदत केली आणि फर्स्ट एडचे प्रशिक्षण घेतलेल्या बॅटलफिल्ड नर्सिंग असिस्टंटने उपचार केले. त्यानंतरही टीमने शस्त्रे सक्रिय ठेवत प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत कारवाई थांबवली नाही.
 
जखमी असूनही त्यांनी आपले कर्तव्य निभावत तब्बल १२ ते १३ मिनिटे त्या ठिकाणी थांबून फायरचे समन्वय साधले. यावेळी त्यांच्यावर मॉर्टार फायर कंट्रोलरची अतिरिक्त जबाबदारीही होती, ज्याअंतर्गत शत्रूच्या ठरवलेल्या लक्ष्यांवर प्रभावी हल्ला करण्यात आला.
 
पुंछ परिसरातील संघर्षाबाबत मेजर ब्लेज म्हणाले की, नियंत्रण रेषेवर शत्रू इतक्या जवळ असतात की ते स्पष्ट दिसतात. थेट सैन्यावर हल्ला करण्याची हिंमत नसल्याने त्यांनी नागरिकांना लक्ष्य केले. मात्र पहलगाम आणि पुंछवरील हल्ल्यांनंतर राष्ट्रीय रायफल्समधील प्रत्येक जवान बदला घेण्यास सज्ज होता आणि त्यामुळेच जोरदार प्रत्युत्तर देत शत्रूवर मोठा आघात करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0