मेडिकलच्या डॉक्टरांनी वेळेत उपचार करून मजुराला दिले जीवनदान

31 Dec 2025 14:42:30
नागपूर, 
Pench bear attack incident : पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगलात काम करत असलेल्या मजुरावर अस्वलाने हल्ला केल्याने जखमीवर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. मेडीकलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेत उपचार करून मजुराला नवे जीवनदान दिल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली आहे.
 
 
medical
 
 
 
जंगलात घालताना झाला हल्ल्ा
 
 
पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगलात काम करत असताना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसोम्तुंडी येथील रहिवासी माणिकराम चौधरी (वय ४५) यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. माणिकराम चौधरी हे पेंच अभयारण्यात वनविभागात रोजंदारी म्हणून कार्यरत असून, नेहमीप्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांच्यावर हल्ल्ा झाला होता.
 
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार
 
 
अस्वलाच्या भीषण हल्ल्यात माणिकराम चौधरी यांचा संपूर्ण चेहरा गंभीररीत्या जखमी झाला होता.तर एका हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले होते. या घटनेनंतर रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, येथील संलग्न ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रसंगी वनविभागातील वरिष्ठ तातडीने समन्वय साधत रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये डॉ. जितेंद्र रामगावकर (अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पूर्व विभाग), पियुषा जगताप (क्षेत्रसंचालक), धनंजय बापट (राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य) तसेच आयेशा लांबट (वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा) यांनी पुढाकार घेतला होता.
 
चेहर्‍यावर झालेल्या गंभीर जखमांवर शस्त्रक्रिया
 
 
मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांना या हल्ल्याची माहिती कळताच वैद्यकीय डॉ.अविनाश गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रीय करून उपचारास गती दिली होती. यावेळी ट्रॉमा केअर सेंटरचे डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ.पंकज टोंगसे (सर्जरी) व न्यूरोसर्जेन डॉ. अजिंक्य आकरे या वैद्यकीय पथकाने रुग्णाची सर्व आवश्यक तपासणी करून उपचार सुरू केले. चेहर्‍यावर झालेल्या गंभीर जखमांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याने डॉ. विकास आणि डॉ. कायनात खान यांनी रुग्णाच्या चेहर्‍यावर दोन महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून रुग्णाची प्रकृती स्थिर केली. दरम्यान, अस्वलाच्या हल्ल्यात रुग्णाच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले होते. या जखमेवर ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. इंगळे यांच्या पथकाने तातडीची शस्त्रक्रिया करून रुग्णाचा हात वाचवण्यात यश मिळवले.
  
वैद्यकीय मदत उपलब्ध
 
 
रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय व मदत रुग्णालयाकडून वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. तर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मानव आणि वन्यजीव संघर्ष काही प्रमाणात अटळ आहे. अशा घटनांमध्ये जखमी झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मेडिकल प्रशासन सातत्याने सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत असते. रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर माणिकराम चौधरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा जीव वाचवल्याबद्दल मेडिकलमधील सर्व डॉक्टर, स्टाफ नर्सेस तसेच इतर कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
Powered By Sangraha 9.0