मिरा-भाईंदर,
mira-bhayandar-ncp-candidate-died मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मिरा रोड येथील नया नगर परिसरातील निवडणूक कार्यालयाजवळ घडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत अचानक जावेद पठाण (वय 66) यांची प्रकृती बिघडली.

जावेद पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी लढवत होते. अर्ज दाखल करून बाहेर पडताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीय आणि समर्थकांनी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला. mira-bhayandar-ncp-candidate-died प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार उमेदवारी अर्जाच्या ताणामुळे, धावपळीमुळे आणि वयानुसार ही दुर्घटना घडली असावी, मात्र नेमके कारण अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपाच्या उमेदवार वनिता बने यांनाही तिकीट नाकारल्यानंतर अस्वस्थतेमुळे हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सलग अशा घटनांमुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या आरोग्याची चिंता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.