नृसिंह पुराण

31 Dec 2025 13:00:33
narasimha purana महर्षी व्यासांनी मूळ अठरा पुराणांची रचना केली. तशीच त्यांनी अठरा उपपुराणेही लिहिलीत. नृसिंह पुराण या अठरा उपपुराणातील एक उपपुराण आहे. पुराण आणि दशावताराची सांगड व्हावी म्हणून आतापर्यंत पाहिलेल्या भगवान विष्णूंच्या अवतारमालिकेतील पुढील अवतार म्हणजे भगवान नृसिंह. हा अवतार समजून घेण्यासाठी या उपपुराणाला मुद्दाम हात घातला. नृसिंह पुराणात साहजिकच भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची चर्चा असणे क्रमप्राप्त आहे.
 
 
nursinh puran
 
 
नृसिंह पुराणात एकूण अडुसष्ठ अध्याय असून तीन हजार चारशे चौसष्ट श्लोक आहेत. नृसिंह अवतार हा अर्धमनुष्य अर्ध पशू असा अवतार आहे. या आधीचे तीन अवतार मनुष्येतर आहेत. त्यामुळे हा अवतार नरपशू असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे.
नृसिंह पुराणात भगवान नृसिंह अवताराबद्दलचा कथाभाग अध्याय 40 च्या पुढे असला तरी अवताराचे माहात्म्य प्रारंभापासूनच आहे. प्रारंभीच भरद्वाज मुनी सुत महाशयांना नृसिंह पुराण सांगण्याची विनंती करतात.
सांप्रतं नारसिंहाख्याम् त्वत: पौराणसंहिताम् ।
श्रोतुमिच्छाम्यहं सूत श्रोतुकामा इमे स्थिता: ।।
त्यानुसार ते हे पुराण सांगतात.
सुत महामुनी भरद्वाज संवादात अनेक विषय आहेत.
ब्रह्मदेवाचे आयुष्य आणि कालगणना, दक्षप्रजापती यांचा जीवनवृत्तांत, मार्कंडेय महामुनींचे जीवनचरित्र, त्यांचा मृत्यूवरील विजय, महामृत्युंजय स्तोत्र, यम संवाद, यमगीता, यम आणि यमाची बहीण यमी यांचा संवाद, ‘‘ॐ नमो नारायणाय’’ या अष्टाक्षरी मंत्राचा महिमा, विश्वकर्मा द्वारा सूर्यस्तुती, विविध वंश वर्णन, शांतनू चरित्र, धृव चरित्र, भगवंताचे दशावतार जसे मत्स्य, कच्छ, वराह, परशुराम असे दहाही अवतार यांचे संक्षेपात चरित्र या पुराणात आहे. त्यातील नृसिंह अवतारासोबतच भगवान रामचंद्राचे विस्तृत चरित्र यात आहे. भगवान श्रीकृष्ण चरित्रही अंशत: आहे.
 
नृसिंह अवताराचे विश्लेषण करताना अध्याय 40 ते अध्याय 44 पर्यंत नृसिंह भगवंताची अवतार कथा सांगतात.
यात राजा सहस्रानिक आणि भृगु ऋषी यांचा संवाद सुरू असताना राजा सहस्रानिक भृगु ऋषींना भगवान विष्णूंच्या अवतार कथा सांगण्याची विनंती करतात तेव्हा भृगु ऋषी मार्कंडेय महामुनींना कथा सांगण्याची सूचना करतात. त्यामुळे या पुराणात प्रारंभी राजा सहस्रानिक आणि भृगु ऋषी संवाद आहे. त्यानंतर दशावतार सांगताना सहस्रानिक आणि मार्कंडेय संवाद आहे. नृसिंह अवताराची कथा मार्कंडेय महामुनी राजा सहस्रानिक यांना सांगतात.
 
सनतकुमारांच्या शापाने जय आणि विजय दैत्यकुळात जन्म घेतात. त्यातील विजय हिरण्यकश्यपू रूपात जन्म घेतात. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची सहस्र वर्ष निराहार उपासना आणि घोर तपश्चर्या केल्यामुळे त्याला ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त होते की त्याचा मृत्यू ना शस्त्राने ना अस्त्राने, ना मानव ना पशू, ना दिवसा ना रात्री, ना आत ना बाहेर, ना आकाशात ना जमिनीवर होऊ नये म्हणून अशा अनेक अशक्य बाबी वरदान म्हणून त्याने ब्रह्मदेवाला मागितल्या आणि देवाने त्याला त्या दिल्या.
त्या वराने हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य उन्मत्त झाला. स्वत:लाच देव समजू लागला. प्रजेलाही त्याने देव पूजा नाही तर स्वत:चीच पूजा करण्याच्या सूचना दिल्यात. सर्वत्र अराजक माजू लागले. यामुळे भीतिपोटी देवराज इंद्राने देवगुरू बृहस्पतींना हिरण्यकश्यपूच्या वधाचा उपाय विचारल्यावर सर्व देवगण भगवान महादेवासह भगवान विष्णूंकडे गेले. तेथे गेल्यावर भगवान विष्णूंनी सर्वांना भयमुक्त करण्याचे वचन दिले आणि सांगितले की हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद नावाचा पुत्र जन्माला येईल. त्याच्या योगाने या दैत्याचा वध मी करेन.
 
इकडे हिरण्यकश्यपूने पुन्हा तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. त्याचे आप्तगण त्याला म्हणू लागले की आपण त्रिभुवनाचे स्वामी. आता अजून काय हव ? तपश्चर्या नको आता. पण त्याने ऐकले नाही. काही हितकारी लोकांना घेऊन तो तप करू लागला. त्यामुळे देवगण चिंताग्रस्त झाले. त्यांनी ब्रह्मदेवांजवळ जाऊन चिंता व्यक्त केली.narasimha purana ब्रह्मदेवही काळजीत पडले तेव्हा देवर्षी नारदांनी मी तपश्चर्येत बाधा निर्माण करतो असे सांगून नारदमुनींनी त्यांच्या सोबत पर्वतमुनींना घेतले. दोघांनीही पक्ष्याचे रूप घेतले. जिथे हिरण्यकश्यपू तपश्चर्या करीत होता त्या ठिकाणी झाडावर बसून ॐ नमो नारायणाचा जप मोठ्या आवाजात करू लागले. त्यामुळे हिरण्यकश्यपूची तपश्चर्या भंग होऊन तो क्रोधित झाला. तो आसन सोडून पक्ष्यांच्या मागे लागला. तपश्चर्या भंग झाल्याने देवांचे संकट टळले. आता तो दैत्य घरी परत आला. त्यांनतर त्याची पत्नी कयाधू गर्भवती झाली. गर्भात असताना त्याच्यावर देवर्षी नारदाच्या आश्रमात राहण्याचा योग आला. त्या आश्रमातील दैवी संस्काराने तो प्रल्हाद वैष्णव झाला.
ही बाब स्वत: प्रल्हादांनी त्यांचे गुरू शांड आणि अमर्क यांना सांगितली.
विष्णुभक्त्या प्रमुच्याथ गत: स्वं भुवनं हरि: ।
नारदस्तां समानिय आश्रमं स्वं शुभव्रत: ।।
हे नृसिंह पुराणात विदित आहे.
आपला पुत्र विष्णूंची आराधना करतो हे पाहून दैत्यराज हिरण्यकश्यपूने त्याला समजावून सांगण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण प्रल्हादावर काहीच परिणाम होत नाही हे पाहून त्याला मारून टाकण्याचा त्याने आदेश दिला. अनेक क्रूर प्रयत्न करूनही त्याला मारण्यात यश येत नाही हे पाहून एक दिवस चिडून त्याने कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात आहे का?
त्वयोक्तंस हि सर्वत्र, कस्मात्स्तंभे न दृश्यते ।
यदि पश्यामि तं विष्णुमधुना स्तंभमध्यगाम् ।।
विचारल्यावर स्वयं नारायण नृसिंह रूपात प्रकट झालेत. दैत्याला मिळालेल्या वरदानाच्या सर्व अटी अबाधित ठेवून भगवान नृसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. कथा सर्वांना माहीत आहे.
आजही ही कथा सांप्रत स्थितीत आपल्यासाठी लागू पडते. सध्याही अनेक हिरण्यकश्यपू भारत आणि भारतीय संस्कृतीवर आघात करीत आहेत. भारतीय समाज मात्र खांबासारखा स्तब्ध आहे. संघासारख्या अनेक संघटना प्रल्हाद बनून जागरण करीत आहेत. खांबासारख्या निष्क्रिय नरांमधून सिंह जागृत व्हावा आणि सारा समाज नृसिंह बनावा. हिरण्यकश्यपूचा वध करून इथे ईश्वराचे रामराज्य निर्माण व्हावे. हाच या पुराणाचा आतासाठी संदेश आहे.
भगवान नृसिंह अनेकांचे कुलदैवत आहे. उग्ररूप धारण केलेल्या नृसिंह भगवंताची आराधना घोर संकटातून मुक्त करते. या शिवाय शत्रूमध्ये असलेला शत्रुभाव नष्ट करण्याचे सामर्थ्य नृसिंह मंत्रात आहे.
ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहम् ।।
 
प्रा. दिलीप जोशी, वाशीम.
9822262735
Powered By Sangraha 9.0