मुंबई,
nashik-solapur-akkalkot-corridor पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत देशातील पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित अंदाजे खर्च सुमारे २०,६६८ कोटी रुपये इतका आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉर आणि ओडिशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३२६ च्या रुंदीकरण व मजबुतीकरण प्रकल्पाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ३७४ किलोमीटर लांबीच्या नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला बीओटी (टोल) पद्धतीने मंजुरी देण्यात आली असून, यासाठी सुमारे १९,१४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा कॉरिडॉर नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना थेट कुर्नूलशी जोडणार आहे. nashik-solapur-akkalkot-corridor पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या तत्त्वांनुसार एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रस्तावित ग्रीनफील्ड कॉरिडॉर दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे, आग्रा–मुंबई महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि वाधवन पोर्ट इंटरचेंजशी जोडला जाणार आहे.हा प्रवेश-नियंत्रित सहा लेनचा कॉरिडॉर पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. चेन्नई बंदरापासून सुरू होणाऱ्या आणि तिरुवल्लूर, रेणीगुंटा, कडप्पा व कुर्नूलमार्गे महाराष्ट्र सीमेपर्यंत पोहोचणाऱ्या आधीच सुरू असलेल्या चार लेन मार्गांना हा प्रकल्प पूरक ठरणार आहे. या नवीन कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ तब्बल १७ तासांनी कमी होणार असून अंतरात सुमारे २०१ किलोमीटरची बचत होईल. त्यामुळे प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीसाठी कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
नाशिक–अक्कलकोट कनेक्टिव्हिटीमुळे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाच्या कोपर्थी आणि ओरवाकल या महत्त्वाच्या औद्योगिक नोड्सना मोठा फायदा होणार आहे. nashik-solapur-akkalkot-corridor याशिवाय नाशिक–तळेगाव दिघे हा विभाग प्रस्तावित पुणे–नाशिक एक्सप्रेसवेचा भाग ठरणार असून, हा हाय-स्पीड कॉरिडॉर सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा सहा लेनचा टोलयुक्त ग्रीनफील्ड कॉरिडॉर सरासरी ६० किमी प्रतितास वेगासाठी आणि १०० किमी प्रतितास डिझाइन वेगासाठी तयार करण्यात येणार आहे. यामुळे एकूण प्रवास वेळ सुमारे ४५ टक्क्यांनी कमी होईल. या प्रकल्पातून थेट सुमारे २५१ लाख मनुष्यदिवस आणि अप्रत्यक्ष सुमारे ३१४ लाख मनुष्यदिवस रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यासोबतच मंत्रिमंडळ समितीने ओडिशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३२६ च्या ६८.६०० ते ३११.७०० किलोमीटर दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासही मंजुरी दिली आहे. nashik-solapur-akkalkot-corridor ईपीसी पद्धतीने होणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १,५२६.२१ कोटी रुपये असून, त्यामध्ये नागरी बांधकामाचा मोठा वाटा आहे. या महामार्गाच्या सुधारणा झाल्यानंतर दक्षिण ओडिशातील गजपती, रायगड आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह होणार आहे. सुधारित रस्ते संपर्कामुळे स्थानिक नागरिक, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि पर्यटन क्षेत्राला थेट फायदा होईल. बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होईल, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्यामुळे संबंधित भागांचा सर्वांगीण व समावेशक विकास साधला जाईल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.