राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा

31 Dec 2025 19:08:04
बुलढाणा, 
kiran-patil : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले.
 
 
jhk
 
 
 
या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॅार्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कींगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी.
 
 
कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणार्‍या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणार्‍या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी यावेळी दिले. याबैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.
 
 
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा सह आयुक्त जी एस पेंटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, तहसिलदार, मुख्याधिकारी, मराठा सेवा संघाचे राज्य संघटक मनोहर तुपकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके, व्यवस्थापक सुभाष कोल्हे यांच्यासह महावितरण, अग्निशमन, नगरविकास, आरोग्य, एसटी महामंडळ आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0