मुंबई,
Sanjay Raut receives death threat : सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. प्रचाराला वेग आला असून, राजकीय पक्ष मुंबई महानगरपालिकेत विजय मिळवण्यासाठी जोर लावत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सक्रीय झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेत युती घडवून आणण्यात राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संजय राऊत यांचा मध्यस्थीचा असा वाटा दिसून आला.
असे असतानाच, संजय राऊत यांच्या घरासमोर धक्कादायक परिस्थिती उभी राहिली. त्यांच्या घराजवळ ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे स्टिकर लावलेली गाडी आढळून आली. भांडूप येथील राऊत यांच्या घरातील काही कर्मचारी आणि कुटुंबीयांनी ही माहिती संजय राऊत यांच्या भावाला देऊन मुंबई पोलिसांकडे पोहोचवली. तत्काळ बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीस राऊतांच्या घरावर दाखल झाले. घराच्या आसपास आणि परिसरात सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे, तर स्टिकर कोणी लावले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
संजय राऊत नेहमी पत्रकार परिषद घेत असतात आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप चालू असतात. या पार्श्वभूमीवर राऊतांच्या घराबाहेर असलेल्या स्टिकरमागे कोणता उद्देश लपला आहे, याची पोलिस तपासणी करत आहेत.