वाशीम,
bank-employees-protest : देशभरातील बँकांमध्ये ५ दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी विविध आंदोलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३० डिसेंबर रोजी सर्व जिल्हास्तरावर निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यूनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या आवाहनानुसार पाच दिवसाचा बँक आठवडा या मागणीसाठी वाशीम येथे बँक कर्मचार्यांनी एकत्र येत आंदोलन केले.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, बँक कर्मचार्यांची ५ दिवस आठवड्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यापूर्वी विविध आंदोलनांदरम्यान ही मागणी तत्वतः मान्य करण्यात आली असली, तरी अद्याप सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर युएफबीयू ने केवळ या एकाच मागणीसाठी देशव्यापी आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आहे.
बँक कर्मचारी हे केवळ व्यवहार करणारे यंत्र नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सध्या बँकिंग क्षेत्रात कामाचा ताण प्रचंड वाढलेला असून डिजिटल बँकिंग, वाढती लक्ष्ये, ग्राहकांच्या अपेक्षा व सतत बदलणार्या धोरणांमुळे कर्मचार्यांवर मानसिक व शारीरिक ताण वाढत आहे. पाच दिवस बँक व्यवहारामुळे कर्मचार्यांचे आरोग्य सुधारेल, कुटुंबाला वेळ देता येईल, कामातील एकाग्रता व कार्यक्षमता वाढेल तसेच ग्राहक सेवेचा दर्जा अधिक चांगला होईल, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून अंमलबजावणी करावी, अन्यथा आगामी सर्व आंदोलन कार्यक्रम अधिक तीव्रतेने व १०० टक्के सहभागासह राबवण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या आंदोलनात जवळपास ४० बँकांचा कर्मचारी सहभागी झाले होते.