डॉ. विजय काळे सातार्‍याच्या संमेलनात निमंत्रित कवी

31 Dec 2025 17:17:37
वाशीम, 
vijay-kale : नवीन वर्षारंभाच्या पर्वावर सातारा येथे होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील युवा कवी तथा वाशीमचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. डॉ. काळे निमंत्रितांच्या कवि संमेलनात २ जानेवारी रोजी आयोजित कंवी संमेलनात आपली कविता सादर करणार आहेत.
 
 
KALE
 
 
 
वाशीम येथील सशक्त युवा कवी डॉ. विजय दामोदर काळे यांची निमंत्रितांच्या कविसंमेलनामध्ये वर्णी लागली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात याआधी वाशीम जिल्ह्यातून पद्मश्री नामदेव कांबळे आणि बाबाराव मुसळे या दोन थोर साहित्यिकांनाच आतापर्यंत निमंत्रण मिळालेले आहे. त्यांच्यानंतर निमंत्रित म्हणून डॉ. विजय काळे हे जिल्ह्यातील तिसरेच साहित्यिक ठरले आहेत. कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी ते वाशीमहून रवाना झाले. शुक्रवार, २ जानेवारीला उद्घाटन सत्र आटोपल्यानंतर, दुपारी तीन वाजता होणार्‍या निमंत्रितांच्या कविसंमेलनात डॉ. विजय काळे हे आपली कविता सादर करतील.
 
 
 
व्यवसायाने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ. विजय काळे यांनी आतापर्यंत अनेक कविसंमेलने गाजविलेली आहेत. साधे शब्द आणि काळजाला भिडणारा अर्थ हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवितेचे प्रभावी सादरीकरण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वर्‍हाडाच्या मातीतील संवेदनशील कवी असलेल्या डॉ. विजय काळे यांच्या कवितांना देशी धार आहे. त्यातील वक्रोक्ती आणि व्यंग, तिरकसपणा रसिकांना भावतो. कारूण्य आणि वास्तव या धाग्यांनी विणलेली काळे यांची कविता एक अस्वस्थ सत्य सांगते आणि रसिकांना व्याकूळ करते. अशा दमदार कवीला सातार्‍याचे निमंत्रण मिळाल्याने वाशीमच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0